20 मेंढय़ांची प्रकृती गंभीर
हुपरी वार्ताहर
रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मेंढपाळ जंगमवाडी रोडवर मेघराजजवळ मेंढ्य़ा चारत असताना खरकटे अन्न खाल्यामुळे विषबाधा होऊन 16 मेंढ्य़ा मृत्यू झाल्या आहेत. यामध्ये अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मेंढपाळाने दिली. काही मेंढ्य़ांची प्रकृती गंभीर असल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रेंदाळ येथील कृष्णात बाबूराव पुजारी, दत्ता बाबूराव पुजारी, महाळू बाळू पुजारी या मेंढपाळांच्या एकूण 150 मेंढय़ा आहेत. त्यापैकी 16 मेंढ्य़ा मृत्युमूखी पडल्या आहेत. 15 ते 20 मेंढय़ा गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुजारी हे मेंढराबरोबर या गावातून त्या गावात शेतात मेंढरे बसवतात. या मेंढपाळानी जंगमवाडी रोडकडेला असलेल्या मेघराजानजीक एका शेतात मेंढ्य़ांचा तळ ठोकला होता. यामध्ये 150 मेंढय़ा होत्या. दोन दिवसांपूर्वी या मेंढय़ांना ब्रेड पाव, चपाती, पुरी असे खरकटे अन्न खायला घातले होते. काही तासांनी त्यांचे पोट फुगून अस्वस्थ झाल्याचे निदर्शनास आले. उपचार सुरू असतानाच गॅसचे रक्तात रूपांतर झाल्याने 15 मेंढ्य़ा व एका शेळीचा मृत्यू झाला. त्यामुळे मेंढपाळ लोकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
उर्वरित मेंढ्य़ांच्या उपचारासाठी हातकणंगले येथील राज्य पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी व हुपरी, रांगोळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी तातडीने हजर झाले. त्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.