पणजी : पणजी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना एका खाण लीज नूतनीकरण प्रकरणातून सात वर्षांनंतर मोठा दिलासा दिला आहे. कामत यांच्यासह खाण व्यावसायिक रवींद्र प्रकाश तसेच अन्य 16 जणांची बेकायदेशीर खाण प्रकरणाच्या आरोपातून मुक्तता केली आहे. दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना (2007-2012) एका खाण लीजच्या नूतनीकरणात बेकायदेशीर कारभार केल्याचा आणि त्यामुळे नूतनीकरण होण्यास विलंब झाला असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मुदत संपूनही खाण लीज सुरूच ठेवण्यास परवानगी (कोंडोनेशन ऑफ डिले) दिल्याचा संशय कामत यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 2018 मध्ये स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तत्कालीन भाजप सरकारने तक्रार दाखल केली होती. एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रात कामत यांच्यासह 17 जणांची नावे होती. राज्यातील काही लिजधारकांनी ‘मॅग्नम’ सोबत करार केला आणि त्याद्वारे राज्य तसेच केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय लीजचे अधिकार हस्तांतरित केले होते.
त्यावेळी खाणमंत्रीही असलेल्या दिगंबर कामत यांच्याच आशीर्वादाने खनिज उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप कामत यांच्यावर करण्यात आला होता.केंद्रीय खाण मंत्रालयाच्या नियमानुसार राज्य सरकारकडे असा कोणताही अधिकार असत नाही. तरीही, मुख्यमंत्री कामत यांनी आयएएस असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोप असलेल्यांमध्ये दिगंबर कामत, खाण व्यावसायिक रवींद्र प्रकाश, प्रशांत साहू, प्रभावती वैकुंठ काडणेकर, अजित वैकुंठ काडणेकर, प्रेमानंद वैकुंठ काडणेकर, माधवराव काडणेकर, वैकुंठराव शिवानंद काडणेकर, नीना काडणेकर, रेखा काडणेकर, काशीबाई रायकर उर्फ शिल्पा शिवानंद काडणेकर, रामकृष्ण रायकर, सरस्वती चोडणकर उर्फ सीमा शिवानंद काडणेकर, मॅग्नम मिनरल्स प्रा. ली., तत्कालीन खाण अधिकारी हेक्टर सी. एम. सी. फर्नाडिस, आग्नेलो टी. डिसोझा आणि रामनाथ शेटगावकर यांचा आरोपीमध्ये समावेश होता. कामत यांच्यासह 17 जणांना न्यायालयाने काल शुक्रवारी दोषमुक्त केले आहे.
गोव्यातील गाजलेला खाण घोटाळा
दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना साल 2007 ते 2012 या काळात गोव्यात 35 हजार कोटी ऊपयांचा खाण घोटाळा झाला असल्याचा आरोप न्यायमूर्ती एम. बी. शाह चौकशी आयोगाच्या अहवालात नमूद केले होते. शाह यांनी कामत यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून घेतले होते. केपे येथील काडणेकर माईन्समधून मॅग्नम मिनरल्स प्रा. ली. ने बेकायदेशीररीत्या खनिजमालाचे उत्तखन केले, आणि त्यातून चीन येथे सुमारे 2 मिलियन टन खनिजाची निर्यात केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यावर आधारून एसआयटीकडे तक्रार करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.









