भावांना राखी बांधण्यास आलेल्या बहिणीचा झाला होता खून : भावांनी न्यायालयात तब्बल 13 वर्षे दिला लढा
प्रतिनिधी/ बेळगाव
भावांना राखी बांधून परत आपल्या गावी जाणाऱ्या बहिणीचा आणि तिच्या पतीचा खून करणाऱ्या 16 जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तब्बल 13 वर्षे भावाने न्यायालयात आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी लढा दिला. सरकारी वकिलांनी भक्कमपणे आपली बाजू मांडली आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही साक्ष दिल्याने 16 जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले असून मंगळवार दि. 18 रोजी त्या सर्वांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
राजकीय वैमनस्यातून हा खून झाला होता. रामचंद्र अप्पय्या अरेर (वय 40) आणि पार्वती अप्पय्या अरेर (वय 35, दोघेही रा. तिगडोळी) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांचा राजकीय वर्चस्वातून मयत बाळाजा कुदळी, मुख्य आरोपी राजू कुबेरप्पा क्यातन्नावर, बसाप्पा शिरगापूर, मयत बसाप्पा मुगळी, दुंडाप्पा पारिश्वाड, शिवलिंगय्या बानिमठ, अजित क्यातन्नावर, शिवाजी संभोजी, तवणाप्पा कलगौडर, कल्लाप्पा जायक्कण्णावर, सावंत किरबन्नावर, संतोष मडिवाळकर, बाबु मंडेद, मंजू जाक्यण्णावर, मयत पारिस रेंटी, सातू शिरगापूर (सर्व रा. तिगडोळी, ता. बैलहोंगल), बाळू उर्फ सिंदूर उर्फ गोपीनाथ मुचंडी (रा. रामदेव गल्ली, वडगाव), अनिल बसाप्पा उपरी (रा. वडगाव), दीपक होसुरकर (रा. जुने बेळगाव) अशी न्यायालयाने दोषी ठरविलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील किरण उर्फ विनायक परिट (रा. बेळगाव) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तिगडी ग्राम पंचायत अध्यक्ष म्हणून मयत पार्वती रामचंद्र अरेर या कार्यरत होत्या. त्या उत्तमप्रकारे ग्राम पंचायतचे काम पाहत होत्या. त्यांचे पती रामचंद्र हे सरकारी कंत्राटी कामे घेत होते. ग्राम पंचायतमधीलही कामे दुसऱ्यांच्या नावे घेऊन ते काम करत होते. याच ग्राम पंचायतमध्ये आरोपी राजू कुबेरप्पा क्यातन्नावर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना या दोघांवर राग होता. बऱ्याचवेळा वादावादी, भांडणे झाली. मात्र रामचंद्र आणि त्यांच्या पत्नीने त्याला दाद दिली नाही.
राजूला या दोघांवर राग होता. त्यांचा काटा काढण्याचे त्याने ठरविले. त्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवली. दि. 13 ऑगस्ट 2011 रोजी रक्षाबंधनसाठी आदर्शनगर-वडगाव येथे पार्वती व तिचा पती रामचंद्र हे आले होते. भावांना राखी बांधली. त्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून तिगडोळीकडे चालले होते. याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले राजू याच्यासह वरील सर्व संशयित ट्रॅक्समधून बेळगावाला आले होते. त्यांनी त्यांच्या पाठीमागून जाऊन नेग्गूर-बोगूर या रस्त्यावर हुनशीकट्टी यांच्या जमिनीजवळ या दोघांना अडविले.
त्यानंतर आपल्याकडील शस्त्राने रामचंद्र आणि पार्वती यांच्यावर वार केले. त्यावेळी तेथे शेतामध्ये दोघे काम करत असलेल्यांनी ही घटना पाहिली. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर शेतात काम करणाऱ्या त्या दोघांनी मयत रामचंद्र यांच्याकडील मोबाईल घेऊन फिर्यादी रमेश बसाप्पा संभोजी यांना संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली.
फिर्यादी रमेश यांच्यासह काहीजण घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी वरील सर्व संशयितांविरोधात नंदगड पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. वरील सर्वांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता खून केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 120(बी), 341, 302, सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी येथील दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले.
त्याठिकाणी 32 जणांची साक्ष, 84 कागदपत्रे पुरावे, 28 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये हे सर्वजण दोषी आढळले आहेत. न्यायाधीश ईरण्णा ई. एस. यांनी दोषी ठरविले आहे. मंगळवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यांना दोषी ठरविल्यामुळे मयत पार्वतीच्या भावांनी आम्हाला न्याय मिळाला, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सरकारी वकील बारावली यांचा युक्तिवाद मोलाचा
या खटल्यातील दोघा संशयितांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आम्ही त्यांचा खून केला हे खरे आहे, मात्र आम्हाला माफ करा आणि आम्ही या खटल्यामध्ये माफीचे साक्षीदार होतो म्हणून अर्जामध्ये म्हटले होते. मात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी साक्ष दिल्यामुळे आम्हाला त्याची काहीच जरूर नाही. त्या दोघांनाही शिक्षा झालीच पाहिजे, असा जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयासमोर सर्व बाबी ठोसपणे मांडल्या. सरकारी वकील आर. ए. बारावली यांनी केलेल्या युक्तिवादामुळे या सर्वांना दोषी ठरविले आहे.
तब्बल 13 वर्षांनंतर निकाल
राजकीय वर्चस्वातून झालेल्या या खून प्रकरणाचा खटला तब्बल 13 वर्षे सुरू आहे. यामध्ये अनेक न्यायाधीश बदलले. त्यामुळे खटल्याचा निकाल लागण्यास बराच उशीर लागला. एक वर्षापूर्वी नियुक्त झालेले न्यायाधीश ईरण्णा ई. एस. यांनी जलदगतीने हा खटला चालवून या सर्वांना दोषी ठरविले आहे. तब्बल 13 वर्षांनंतर या खटल्यातील आरोपींना शिक्षा दिली जाणार आहे.









