ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजप आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, काँग्रेसकडून या जागेसाठी 16 जण इच्छूक आहेत. आज या इच्छूक उमेदवारांच्या काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी श्रीनगर येथून ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेतल्या.
या ऑनलाईन मुलाखतींनंतर काँग्रेसकडून 16 इच्छूक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, विजय तिकोणे, आरिफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषीकेश वीरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान, शिवाजीराव आढाव आणि गोपाळ तिवारी यांचा समावेश आहे.
या 16 जणांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून, छाननीनंतर दिल्लीतून काँग्रेसचा उमेदवार घोषित होणार आहे. त्यामुळे या 16 जाणांपैकी काँग्रेसचा कसब्यासाठी उमेदवार नेमका कोण असणार याबद्दल उत्सुकता आहे.