निवडणूक आयोगाने दाखविला रिमोट मतदान प्रणालीचा डेमो
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी रिमोट मतदान प्रणालीचा (आरव्हीएम) डेमो दाखवला. स्थलांतरित मतदारांसाठी आरव्हीएम प्रोटोटाइपच्या डेमोसाठी आयोगाने 65 राजकीय पक्षांच्या (8 राष्ट्रीय आणि 57 प्रादेशिक) प्रतिनिधींना बोलावले होते. मात्र, काँग्रेससह इतर पक्षांनी आरव्हीएमबाबत आयोगाकडे सैद्धांतिक स्पष्टता नसल्याचे सांगत डेमो पाहण्यास अनुत्सुकता दर्शवली.
निवडणूक आयोगाने निवडणुकीतील मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे प्रारंभिक मॉडेल तयार केले आहे. या प्रणालीचे राजकीय पक्षांसमोर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मात्र, देशातील 65 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांपैकी बहुतेक प्रतिनिधींनी आरव्हीएम आणि ईव्हीएम संदर्भात शंका-कुशंका उपस्थित केले. विरोधी पक्षांनी आरव्हीएमची संकल्पना, व्याख्या आणि कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, द्रमुक, बसप, सपा यासह बहुतांश विरोधी पक्षांनी आरव्हीएम प्रणाली लागू करण्याच्या प्रयत्नांना कडाडून विरोध केला. स्थलांतरित मतदार कोणाला समजावे आणि देशातील स्थलांतरित मतदारांची एकूण संख्या किती आहे याची माहितीच निवडणूक आयोगाकडे नसल्याचे सांगत ईव्हीएमवर काँग्रेसने स्थापन केलेल्या समितीचे नेतृत्व करणारे दिग्विजय सिंग यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यांच्यापाठोपाठ इतर पक्षांच्या प्रतिनिधींनीही सभात्याग केला. मात्र, भाजप आणि काही प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांशी सविस्तर चर्चा केली.

विरोधाच्या मुद्दय़ावर एकमत घडवण्यासाठी काँग्रेसने दिग्विजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीत 16 समविचारी राजकीय पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत काँग्रेसशिवाय आरजेडी, जेडीयू, शिवसेना, सीपीआय, सीपीआयएम, जेएमएमसह सर्व प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्या पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनीही सोमवारच्या बैठकीत आरव्हीएमच्या प्रस्तावाला विरोध केला. 31 जानेवारीच्या अंतिम मुदतीपूर्वी 25 जानेवारीला विरोधी पक्षाचे प्रतिनिधी एकत्रितपणे किंवा स्वतंत्रपणे त्यांची उत्तरे पाठवण्यासाठी पुन्हा भेटणार आहेत.
बसपचाही तीव्र विरोध
विशेष म्हणजे बसपला सोमवारच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, मात्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना ईव्हीएमसह नव्या आरव्ही यंत्रणेबाबत आक्षेप नोंदवला. ईव्हीएममध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. देशात ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात भीती निर्माण झाल्याचे सांगत यावर मात करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.









