थारोसोकस इंडिकस डायनासोरचे अवशेष
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये वैज्ञानिकांनी शाकाहारी डायनासोरसंबंधी मोठा शोध लावला आहे. आयआयटी रुडकी अणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (जीएसआय) जैसलमरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील जेठवाई क्षेत्रात 16.7 कोटी वर्षांपूर्वीचा जगातील सर्वात जुन्या शाकाहारी डायनासोरचा जीवाश्म शोधला आहे. कच्छ खोऱ्याला लागून असलेल्या या क्षेत्रात 16.7 कोटी वर्षांपूर्वी शाकाहारी डायनासोर येथे राहत होते याची पुष्टी याद्वारे झाली आहे. जैसलमेरच्या थार वाळवंटात मिळालेल्या या जीवाश्माला ‘थारोसोरस इंडिकस’ डायनासोर असे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी 2014 आणि 2016 मध्ये जैसलमेरच्या याच जेठवाई अन् थैयात गावात कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचे जीवाश्म मिळाले होते. वैज्ञानिकांनुसार जैसलमेरचे हे क्षेत्र डायनासोरांचे अधिवास राहिले असावे. येथे सातत्याने मिळत असलेल्या जीवाश्मांच्या अवशेषांना पाहता कच्छ खोऱ्याला लागून असलेल्या या भागात डायनासोरच्या प्रजातींचे आणखी अवशेष मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जैसलमेरच्या जेठवाई क्षेत्रात वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जुन्या शाकाहारी डायनासोरचे ‘थारोसोरस इंडिकस’चे जीवाश्म शोधल्याचा दावा केला आहे. वाळवंटात मिळालेल्या थारोसोरसचा कणा लांब होता आणि डोक्यावर ठोस नाक नव्हते. हे जीवाश्म चीनमध्ये मिळालेल्या जीवाश्मापेक्षाही जुने आहेत. हा डायक्रेओसोराइड सोरोपॉडयुक्त डायनासोर त्यावेळी सुमारे 40 फूट लांबीचे होते असे संशोधकांनी सांगितले आहे. डायनासोरचा हा परिवार डिप्लोडोसॉइड नावाच्या डायनासोरच्या प्रजातीतील आहे. भारतात यापूर्वी कुठल्याही डिप्लोडोसॉइडचा जीवाश्म मिळाला नव्हता. मध्य भारतात याहूनही प्राचीन सोरोपॉड्स बारापासोरस अन् कोटासोरस मिळाले आहेत, त्यांचा कालावधी 19.9 आणि 18.3 कोटी वर्षांपूर्वीचा मानला जातो. वैज्ञानिकांनुसार या सर्व शोधांना जोडून पाहिल्यास भारतीय उपखंड डिप्लोडोसॉइड डायनासोरांची उत्पत्ती अन् विकासाचे केंद्र होते याचे संकेत मिळतात. जीएसआयचे वैज्ञानिक देवाशीष भट्टाचार्य, कृष्ण कुमार, प्रज्ञा पांडे आणि त्रिपर्णा घोष यांनी सुमारे 5 वर्षांपूर्वी या क्षेत्रात संशोधन अन् अध्ययन सुरू केले होते. यादरम्यान जेठवाई गावातील पर्वतांवरील संशोधनादरम्यान सर्वात जुन्या शाकाहारी डायनासोरचे जीवाश्म मिळाले होते. यानंतर सुनील वाजपेयी आणि देवाजीत दत्ता यांनी 2022 मध्ये आयआयटी रुडकी रिसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू केले होते.









