आशिया चषकातील भारत-पाक सामन्यासाठी जाहिरातींचे दर गगनाला
वृत्तसंस्था/ दुबई
आगामी आशिया चषक स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येणार का, त्यांच्यात सामना होणार का, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र हा सामना झालाच तर त्यादरम्यान जाहिरातींसाठी तूफान पैसे खर्च करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय संघ 14 सप्टेंबर रोजी ग्रुप ए मॅचमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे, स्टेडियमवर जितका उत्साह असतो तितकाच उत्साह बाहेर चाहते, जाहिरातदार, ब्रॉडकास्टर्स यांच्यात पहायला मिळत असतो. यातच आशिया चषकाचे प्रक्षेपणाचे अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया कपमधील भारताच्या सामन्यांच्या जाहिरातींचे दर 10 सेकंदांच्या स्लॉटसाठी 14 ते 16 लाख रुपये असणार आहेत. यासाठी जागतिक स्तरावर मोठी चढाओढ पहायला मिळत असल्याचे दिसत आहे. सोनी नेटवर्क्सने आगामी स्पर्धेसाठी जाहिरातींची रेट लिस्ट जारी केली आहे.









