प्रतिनिधी/ बेळगाव
संततधार पावसामुळे रविवार आणि सोमवार दोन दिवसांत शहर व तालुक्यात 16 घरांची पडझड झाली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल तलाठ्यांनी तहसीलदार कार्यालयाला पाठविला आहे. मुसळधार पावसामुळे सध्या कोठेही अनुचित घटना घडली नसली तरी घरांची पडझड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
चार दिवसांपासून जिल्ह्यासह बेळगाव शहर आणि तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रंदिवस पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर जुनी मातीची घरे कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी घरांची पूर्णपणे पडझड होत आहे तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळत आहेत. यामुळे अनेक कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. यापूर्वी मान्सूनपूर्व आणि त्यानंतरच्या पावसातही मोठ्या प्रमाणात घरे कोसळली होती. मध्यंतरी पावसाने उघडिप दिल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पण चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने घरांची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगाव तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत शहर आणि तालुक्यात विविध ठिकाणी 16 घरांची पडझड झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. नुकसानग्रस्त घरांना भेटी देऊन पंचनामे उरकण्याची सूचना तलाठ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी व त्यांचे सहकारी विविध ठिकाणी भेटी देऊन नुकसानग्रस्त घरांचे अहवाल तहसीलदार कार्यालयाला पाठवून देत आहेत.









