मेक्सिकोचे अग्निशामक दल मदतीसाठी दाखल
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आगीतील मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे. आग शमण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता मेक्सिको येथील अग्निशमन दलाचे जवानही देशात दाखल झाले असून मदत बचावकार्यात सहभागी झाले आहे.
आगीने वेढलेल्या भागात मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने श्वानांनी सुसज्ज शोध पथके तैनात केली आहेत. बळींचा शोध घेण्यासाठी ढिगाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 16 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती अधिकाऱ्यांना आहे.
कॅलिफोर्नियातील आगीत हजारो घरे भस्मसात झाली आहेत. या दुर्घटनेमुळे मोठ्या संख्येने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याला ‘युद्ध’सदृश परिस्थिती असे म्हटले आहे. ही आग आणखी तीव्र रूप घेऊ शकते. येत्या काही दिवसात 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. या जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकू शकते. स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असे संकेत दिले आहेत.
आग आटोक्यात येत नसल्याने जनतेमध्ये निराशा वाढत आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी परिस्थितीची तयारी आणि प्रतिसादाचा स्वतंत्र आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. सुरुवातीच्या अग्निशमन प्रयत्नांमध्ये पाण्याच्या कमतरतेबद्दलच्या चिंतेमुळे संताप व्यक्त होत आहे. आगीमुळे प्रभावित झालेल्या भागात लुटीच्या घटनाही घडल्या आहेत. हे थांबवण्यासाठी अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. चोरीच्या घटनांमध्ये 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.









