सीपीआर प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई
परिसराने घेतला मोकळा श्वास
कोल्हापूर
गेली अनेक वर्षे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील रहदारीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत केबिन्सवर सीपीआर प्रशासनाने रविवारी जेसीबी चालवला. यामुळे तासाभरातच सीपीआरने मोकळा श्वास घेतला. केबिनधारकानी गर्दी केल्याने तणावही निर्माण झाला होता.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील केबिन्स हा कळीचा मुद्दा बनला होता. गेल्या काही वर्षांत सीपीआरच्या आवारात एकामागून एक केबिन्स वाढत गेल्या. यामुळे सीपीआरमध्ये येणाऱ्या वाहनांच्या रहदारीला अडथळा होत होता. अनेकवेळा रुग्ण्वाहिकेला रस्ता मिळत नव्हता. ज्या ज्या वेळी या केबिन्सच्या अतिक्रमणचा मुद्दा समोर आला. त्या त्या वेळी राजकीय पाठबळ मिळाले. यामुळे प्रशासनाकडून सक्षमपणे कारवाई झाली नव्हती.
दरम्यान गेल्या आठवडयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी न्यायालयाचा आदेश आहे तर सीपीआरमधील अतिक्रमणावर कारवाई का नाही अशी विचारणा करत अतिक्रमण हटवा अन्यथा स्वेच्छानिवृत्ती घ्या असा दम प्रशासनाला दिला होता. या पार्श्वभूमीवर सीपीआर प्रशासन अॅक्शन मोडवर आले होते. त्याप्रमाणे सीपीआरच्या आवारातील केबिनधारकांना स्वत:हून केबिन काढून घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रविवारी सकाळी सात वाजता सीपीआर प्रशासनाने थेट कारवाईला सुरुवात केली.
दोन पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि 80 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात केबिन्सवर कारवाईला सुरुवात झाली. अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभागासह सर्वच्या ठिकाणी केबिन्स जेसीबीच्या सहाय्याने काही मिनिटातच हटवल्या. यावेळी केबिनधारकांनी गर्दी केली होती. काही केबिनधारकांनी स्वत:हून आपले साहित्य हलवले. तर काहीजणांनी किरकोळ दर्शवला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने धाडसाने सीपीआरच्या आवारातील अतिक्रमणावर कारवाई केल्याने रविवारी सीपीआरने मोकळा श्वास घेतला. यावेळी सीपीआरमध्ये गर्दी झाली होती.
सीपीआर प्रशासनाने गरिबांना उघड्यावर पाडू नये
आमदार राजेश क्षीरसागर सकाळी साडेअकरा वाजता सीपीआरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी चर्चा केली. सीपीआरच्या परिसरात गेले अनेक वर्ष गरीब लोक व्यवसाय करून पोट भरत आहेत. प्रशासनाने त्यांना उघड्यावर न सोडता योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आवाहन केले. सीपीआर परिसरात अवैध कारभार सुरु असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे कोल्हापूरची बदनामी होत असून अशा घटना घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, प्रा. शहाजी कांबळे, रुपा वायदंडे, अभिजित राऊत उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाडून कारवाईसाठी यंत्रणा सीपीआरमधील अतिक्रमण कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मनुष्यबळ पुरवले. तसेच एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर दिले होते. त्यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
साहित्य केबिनबाहेर
सीपीआर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केल्यावर केबिनधारकांनी आपले साहित्य केबिनच्या बाहेर काढले. त्यानंतर केबिन्स हटवल्या. यानंतर दिवसभरात केबिन्सधारकांनी आपले साहित्य सीपीआरमधून हलवले.
पुनर्वसन प्रशासनाच्या अखत्यारित नाही
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आवारातील केबीन्सवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत एकूण 16 केबिन्स हटवल्या. काही केबिन्सधारकांनी स्वत:हून केबिन्स काढून घेत सहकार्य केले. काही केबिन्सना टाळे लावले आहे. या केबिन्सधारकांचे पुनर्वसन करणे प्रशासनाच्या अखत्यारित नाही.
डॉ.एस.एस.मोरे- अधिष्ठाता-राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय








