पुणे / प्रतिनीधी :
एपीएस वेल्थ वेंचर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून देशभरातील शेकडो गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून, त्यांची 16 कोटी 31 लाख 61 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड व इतर संचालक आणि त्यांची पत्नी विशाखा अविनाश राठोड यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 406, 409, 34 सह एमपीआयडी कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ.जगदीश शंकरराव जाधव (वय – 50 वर्ष, रा. वाकड, पुणे) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2018 पासून आतापर्यंत घडलेला आहे. आरोपी राठोड दांपत्याने बाणेर परिसरात धनंजय कॉम्प्लेक्स या ठिकाणी एपीएस वेल्थ वेंचर्स एलएलपी कंपनीचे ऑफिस उघडले. त्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांकडून 1 कोटी 20 लाख रुपये त्यांचेकडील वेगवेगळ्या स्किममध्ये गुंतवणूक करुन घेतली. त्यावर जादा परताव्याचे आमिष दाखवून तसे करार करुन त्यांचा भंग करून गुंतवलेल्या रक्कमेपैकी फिर्यादी यांचे 86 लाख 37 हजार 500 रुपये व इतर शेकडो गुंतवणूकदारांचे 15 कोटी 45 लाख 24 हजार रुपये परत दिले नाहीत. अशाप्रकारे एपीएस वेल्थ वेंचर्स एलएलपी या कंपनीचे संचालक अविनाश अर्जुन राठोड व इतर यांनी संगनमताने फिर्यादी व त्यांचे सारखे शेकडो गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून आरोपी यांनी त्यांचेकडील वेगवेगळया स्कीममध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून गुंतवणूक स्विकारली. तसेच तशाप्रकारे केलेल्या कराराचा भंग करुन गुंतवणूकीची रक्कम व त्यावरील परतावा परत न देता रकमेचा अपहार करुन फसवणूक केली. अशाप्रकारच्या शेकडो गुतवणुकदारांच्या आर्थिक फसवणुकीच्या रक्कमे मध्ये भविष्यात खुप मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड करत आहे.









