स्टार एअरने सुरू केले बुकिंग : 3 हजार 499 प्राथमिक तिकिट दर, राजस्थानी नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱयांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. याचीच दखल घेत देशातील महत्त्वाच्या शहरांना बेळगावमधून विमानसेवा जोडली जात आहे. संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअरने येत्या 16 फेब्रुवारीपासून बेळगाव-जोधपूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने बुकिंगही सुरू केले आहे. यामुळे बेळगाव तसेच परिसरातील राजस्थानी समाजामधून आनंद व्यक्त केला जात आहे.
राजस्थान येथील अनेक नागरिक व्यवसाय व कामानिमित्त बेळगाव तसेच परिसरात स्थिरावले आहेत. या नागरिकांना आता अवघ्या 2 तास 10 मिनिटांमध्ये जोधपूरला पोहोचता येणार आहे. स्टार एअरने यापूर्वी अजमेर शहराला विमानसेवा सुरू केली आहे. आता जोधपूर शहराला विमानसेवा सुरू होत असल्याने बेळगावमधून राजस्थानला जाण्यासाठी दोन विमाने उपलब्ध झाली आहेत. तसेच या विमानफेरीमुळे बेळगावमधून थेट 13 शहरांना जोडले जाणार आहे.
अशी असणार विमानफेरी
बेळगाव-जोधपूर या विमान सेवेसाठी स्टार एअरने 3 हजार 499 रुपये तिकिटाचा प्राथमिक दर निश्चित केला आहे. आठवडय़ातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी विमान फेरी असणार आहे. सकाळी 10 वा. बेळगाव विमानतळावरून निघालेले विमान दुपारी 12.10 वा जोधपूरला पोहोचणार आहे. जोधपूर येथून 12.40 वाजता निघालेले विमान 2.50 वाजता बेळगावला पोहोचणार आहे.
जोधपूर विमान सेवेमुळे कमी वेळेत पोहोचता येणार
बेळगाव शहर व आसपासच्या भागात अंदाजे 9 ते 10 हजार राजस्थान परिसरातील नागरिक वास्तव्याला आहेत. स्टार एअर सुरू करत असलेल्या जोधपूर विमान सेवेमुळे अवघ्या काही तासात राजस्थानला पोहोचता येणार आहे. यापूर्वी राजस्थानला जाण्यासाठी केवळ दोन रेल्वे उपलब्ध होत्या. परंतु त्यांचे बुकिंग कायम फुल्ल असल्याने अनेक समस्या येत होत्या. परंतु बेळगावमधून सुरू झालेल्या अजमेर व आता सुरू होणाऱया जोधपूर सेवेमुळे कमी वेळेत पोहोचता येणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे माजी अध्यक्ष गोपाल उपाध्याय यांनी सांगितले.