कोरोनाचे संकट वाढतेच : राष्ट्रीय टाळेबंदीस अमेरिकेचा नकार : संसर्गाची लक्षणे लपविल्यास श्रीलंकेत शिक्षेची तरतूद
वॉशिंग्टन :
कोरोना विषाणूचे संकट आता 158 देशांमध्ये पसरले आहे. सोमवारी दुपारपर्यंत एकूण 1 लाख 71 हजार 112 रुग्ण आढळले असून मृतांचा आकडा 6526 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 77779 रुग्ण पूर्णपणे बरे देखील झाले आहेत. अमेरिकेच्या 29 प्रांतांमध्ये पुढील आदेशापर्यंत शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अमेरिकेत दोन हजार हायस्पीड लॅब सोमवारपासून सुरू झाल्या असून ट्रम्प प्रशासनाने नॅशनल लॉकडाउनचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. श्रीलंकेत कोरोना विषाणूची लक्षणे लपविणाऱया व्यक्तीला 6 महिन्यांची शिक्षा होणार आहे. तर पोप फ्रान्सिस यांनी महामारी लवकर संपुष्टात यावी याकरता प्रार्थना केली आहे. जर्मनीतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे तेथील सरकारने सोमवारी 6 देशांना लागून असलेली स्वतःची सीमा बंद केली आहे.
जर्मनीने उचलले पाऊल
सीमा बंद करण्याचा अत्यंत कठोर तसेच त्रासदायक असल्याचे आम्ही जाणतो, परंतु संसर्ग रोखण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून ऑस्ट्रिया, स्वीत्झर्लंड, फ्रान्स, लक्झेम्बर्ग आणि डेन्मार्कला लागून असलेली सीमा पुढील आदेशापर्यंत बंद केली जाणार आहे. मालवाहतुकीवर मात्र बंदी नसणार, अशी माहिती जर्मनीचे गृहमंत्री हॉर्स्ट सीरोफर यांनी दिली आहे.
एअर न्युझीलंडमध्ये कर्मचारीकपात
एअर न्युझीलंडचे सीईओ ग्रेग फोरान यांनी सोमवारी विधान प्रसिद्ध केले आहे. कोरोना विषाणूमुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद असल्याने 30 टक्के कर्मचारी कपात करावी लागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोना विषाणूमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार असल्याचे सोमवारीच म्हटले आहे.
जॅक माकडून उपकरणांचा पुरवठा
ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी सोमवारी सकाळी एक छायाचित्र ट्विट केले आहे. मास्क आणि कोरोना विषाणूच्या टेस्ट किट्सने भरलेले एक जहाज अमेरिकेसाठी रवाना झाल्याचे मा यांनी नमूद केले आहे. चीनमधील आरोग्य यंत्रणेचा अनुभव अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकत असतो, असे उद्गारही मा यांनी काढले आहेत.
लेबनॉनमध्ये टाळेबंदी
लेबनॉनने स्वतःची सर्व विमानतळे बंद ठेवली आहेत. सीमा तसेच बंदरांवरून दोन आठवडय़ांपर्यंत कुठल्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. अत्यावश्यक स्थितीच लोकांना घरातून बाहेर पडता येईल. टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले जावे, असे मंत्री मन्नान अब्दुल समद यांनी सांगितले आहे. लेबनॉनमध्ये सोमवारपर्यंत 100 रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण कोरिया दक्ष
दक्षिण कोरियात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीही सरकार सर्वप्रकारची सतर्कता बाळगत आहे. कसोटीचा काळ सद्यस्थितीत संपल्याचे मानता येणार नाही. युरोपमधून येणाऱया लोकांवरील बंधने सद्यकाळात हटविली जाणार नाहीत. परंतु यासंबंधी काही दिवसांनी आढावा घेतला जाऊ शकतो असे तेथील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकारी किम गेन्गलिप यांनी सोमवारी सांगितले आहे. दक्षिण कोरियातील नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे.
जपानमध्ये टेलिग्रॅज्युएशन
जपानमध्ये दरवर्षी मार्च महिन्यात ग्रेज्युएशन सोहळा आयोजित होतो. पण कोरोना विषाणूमुळे यंदा शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमी शिंजो अबे यांच्या सरकारने शैक्षणिक संस्थांना टेलिग्रॅज्युएशन आयोजित करण्याची सूचना केली आहे.
अमेरिकेत 69 जणांचा मृत्यू
सोमवारी सकाळपर्यंत अमेरिकेतील रुग्णांची संख्या 3802 वर पोहोचली असून 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कसह 29 प्रांतांमध्ये सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. काही प्रांतांमध्ये महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. नौदलाच्या युएसएस बॉक्सर या नौकेवरील एका सैनिकाला कोरोनाची लागण झाली आहे.
इराणमध्ये धार्मिक नेत्याचा मृत्यू
इराणच्या कोम शहरात अयातुल्लाह हशम बथाई यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. बथाई यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिया समुदायात धर्माच्या ज्ञानी व्यक्तीला अयातुल्लाह ही पदवी दिली जाते. हशम बथाई हे इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या देखरेखीखालील तज्ञांच्या सभेचे सदस्य होते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारे ते इराणचे 14 वे पदाधिकारी आहेत. पवित्र शहर कोमला कोरोनाचा सर्वाधिक फटाक बसला आहे. इराणमध्ये मागील 24 तासांमध्ये 129 जणांनी कोरोनामुळे जीव गमावल्याने एकूण बळींची संख्या 853 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 1 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण समोर आल्याने इराणमधील कोरोनाचे संकट नियंत्रणात येण्याची चिन्हे अद्याप नाहीत.
श्रीलंकेत कठोर निर्णय
श्रीलंकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे लपविणाऱयाला 6 महिन्यांची शिक्षा होईल. कोरोनाग्रस्त देशांमधून येत क्वारेंटाईन केंद्रात न जाणाऱया व्यक्तींनाही शिक्षा भोगावी लागणार आहे. अशा लोकांना वॉरंटशिवायच अटक केली जाणार असल्याचे कोलंबोचे पोलीस महासंचालक अजित रोहाना यांनी संगितले आहे. श्रीलंकेत कोरोनासंबंधी अफवा पसरविणाऱया 23 जणांना अटक करण्यात आली आहे. तेथे कोरोनाचे 22 रुग्ण आढळून आले आहेत.
चीनच्या 13 प्रांतांमध्ये सुधारणा
चीनमधील 13 प्रांतांमध्ये सोमवारी दुपारपर्यंत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. यात तिबेट आणि शिनजियांग स्वायत्त क्षेत्र, चिंगहई, फुजियान, अनहुई, जिआंग्शी, शंशी, हुनान, जिआंग्शू, चेंग्किंक, गुइझोऊ, जीलिन आणि तिआंजिन सामील आहे.















