वर्षाला बाजारात तब्बल 1867 कोटी 65 लाखांची उलाढाल शक्य
कोल्हापूर / संतोष पाटील :
कोल्हापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता खात्यावर जमा होत आहे. आजअखेर कोल्हापूर जिह्यात 10 लाख 54 हजार 205 अर्ज आले होते. त्यापैकी 10 लाख 37 हजार 585 अर्ज मंजूर आहेत. कोल्हापुरातील लाडकी बहिणीच्या खात्यांवर तब्बल 155 कोटी 63 लाख 77 हजार 500 रुपये महिन्यांला जमा होतात. तर वर्षभरानंतर कोल्हापुरातील बाजारपेठेत निव्वळ लाडकी बहिणीमुळे तब्बल 1867 कोटी 65 लाख 30 हजार रुपयांची उलाढाल होणार आहे.
राज्यात जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली. तेव्हापासून गेल्या तीन महिन्यांत जिह्यातून 10 लाख 22 हजार 41 अर्ज आले आहेत. त्यापैकी 10 लाख 6 हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे 90 टक्के महिलांच्या खात्यावर 3 महिन्यांचे 4500 रुपये जमा झाले. ज्या 1 लाख 11 हजार महिलांचे बँक खाते आधारसोबत लिंक झालेले नाही, त्यांची यादी महिला व बालकल्याण विभागाने गावनिहाय यादी पाठवून या महिलांचे आधार लिंकिंग करायला लावले आहे. आधारकार्ड लिंक नसलेल्या महिलांनाही आता लवकरच या योजनेचा लाभ होणार आहे.
योजना सुरू झाल्यानंतर एकट्या कोल्हापूर जिह्यातील 10 लाख 6 हजार 311 महिला लाभार्थींमुळे गेल्या तीन महिन्यांत शासनाच्या तिजोरीवर तब्बल 452 कोटी 83 लाख 99 हजार 500 इतक्या रकम जमा झाली होती.
कोल्हापूर जिह्यात 10 लाख 37 हजार 585 अर्ज मंजूर आहेत. तसेच 1500 रुपये प्रतिमाह प्रमाणे कोल्हापुरातील लाडकी बहिणीच्या खात्यांवर तब्बल 155 कोटी 63 लाख 77 हजार 500 रुपये महिन्यांला जमा होतील. यामध्ये 600 रुपयांची वाढ झाल्यास जादाचे 62 कोटी 25 लाख 51 हजार रुपये मिळतील. तर 2100 रुपये प्रमाणे महिन्याला 217 कोटी 89 लाख 28 हजार 500 रुपये जमा होणार आहेत.
वाढीव रकमेमुळे वर्षाला 2614 कोटी 71 लाख 42 हजार रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकट्या कोल्हापुरात जमा होणार आहे. ही सर्व रक्कम या ना त्या कारणाने बाजारात पुन्हा येईल. लाडकी बहीण आपल्या खात्यावर येणारी रक्कम रोजच्या संसारोपयोगी कामासाठी वापरात आणत असल्याचे समजते.
महिन्याचे सिलिंडर खरेदी, भाजीचे पैसे, काही महिला पोष्टासह इतर मार्गाने बचत करत आहेत. पहिल्या तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये एकदम खात्यावर आले. यासह पुढील अॅडव्हान्स हफ्ताही मिळाला.
एका बहिणीच्या खात्यावर सरासरी साडेसात हजार रुपये जमा झाले होते. घरात दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला होत्या. त्यांना एकदम 20 हजारांहून अधिकची रक्कम हातात आली. यातील बहुतांश खर्च हा घरातील योजलेली खरेदी, मुलांच्या शाळांची फी आदींसाठी खर्च झाल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेमुळे बाजारात एकदम मोठी उलाढाल झाल्याचे दिसत नसले तरी किरकोळ स्वरुपात खूप मोठी रक्कम चलनात आली. अनेक महिलांच्या खात्यावर ही रक्कम तशीच आहे. बचत म्हणून ठेवलेल्या रकमेमुळे खातेधारक बँकाच्या खात्यावरील ठेवीत पाच कोटीपर्यंत वाढ झाली आहे.
दीड हजार मिळाले, 2100 रुपयांसाठी मार्च उजाडणार ?
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्यांच्या वचननाम्यात दिली होती. परंतु, सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकारची योजना सांगितली होती. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल. तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल. सध्या आचारसंहितेच्या कालावधीत स्थगित केलेल्या निधी वितरणाची सुरुवात केली असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाढीव रक्कम मिळण्यासाठी मार्च 2025 उजाडणार असल्याचे स्पष्ट आहे.
जिल्ह्यावर दृष्टीक्षेप
दाखल अर्ज – 10 लाख 54 हजार 205
लाभार्थी – 10 लाख 37 हजार 585
राज्यातील लाभार्थी : 2ा कोटी 34 लाख








