महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होणार
कोल्हापूर : विविध धार्मिक, दशमहाविद्येचे स्वरुपात बांधलेल्या पूजा, महिला कलाकारांनी सादर केलेले बहारदार भरतनाट्यम आणि भावगीतांनी सलग ११ दिवस गाजत राहिलेला करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवार ७ रोजी आहे. याचदिवशी आलेल्या नवान्न पौर्णिमेचे औचित्य साधून अंबाबाई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. महालक्ष्मी भक्त मंडळ व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्या वतीने हा महाप्रसाद करण्यात येणार आहे.
महाप्रसादाला पाऊस अथवा उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजापासून ते शनी मंदिरापर्यंत पत्र्याचा मंडप उभारला आहे. याच मंडपाखाली सकाळी साहे अकरानंतर आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उद्योजक नीरज झंवर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणाऱ्या या महाप्रसादाचा २० हजारावर भाविक लाभ घेतील, असे नियोजन आहे. तसेच नवरात्रोत्सव काळात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादासाठी महालक्ष्मी भक्त मंडळ व देवस्थान समितीकडे तांदुळ, तेल, डाळ, भरडा, गुळ, विविध प्रकारच्या भाज्या व मसाले पदार्थ असे सर्व हजारो किलोंच्या घरात शिधा दिला आहे.








