झाडे तोडण्यासंदर्भात आक्षेप असल्यास उपवन संरक्षणाधिकारी कार्यालयात नोंदवावेत
बेळगाव : महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपासून राकसकोप ते सुतगट्टीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग-4 या साखळी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने हाती घेतले जाणार आहे. लवकरच कामाला सुरुवात केली जाणार असून रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या विविध प्रकारच्या तब्बल 153 झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. रस्ता रुंदीकरणात जाणाऱ्या झाडांची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने वनखात्याला देण्यात आली आहे.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गासह बेळगाव जिल्ह्यातील विविध रस्त्यांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू असतानाच रिंगरोडचे कामदेखील लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जमीन मालकांना भरपाई दिली जात आहे. तसेच खासदार जगदीश शेट्टर यांनीदेखील सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. त्याचबरोबर बेळगाव ते बाची या रस्त्याचे रुंदीकरणही सुरू आहे. दरम्यानच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे तोडली जात आहेत. यानंतर आता महाराष्ट्र राज्याच्या सीमेपासून राकसकोप ते सुतगट्टी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 या साखळी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.
सदर रस्त्याच्या रुंदीकरणात विविध जातीच्या 153 झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. त्यामुळे याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने वनखात्याला देण्यात आली आहे. 50 हून अधिक झाडे तोडायची असल्यास त्याला जनतेतून हरकती मागविणे गरजेचे आहे. त्यामुळे वनखात्याच्यावतीने अधिनियम 1976 नुसार नियम 8(3)(7) नुसार आक्षेप मागविण्यात आले आहेत. सदर झाडे तोडण्यासंदर्भात कोणाचे आक्षेप असल्यास बुधवार दि. 12 मार्च 2025 रोजी उपवन संरक्षणाधिकारी बेळगाव यांच्या कार्यालयात नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.









