भारतीत तटरक्षक दल-डीआरआयची संयुक्त मोहीम ः 218 किलो हेरॉईन हस्तगत
कोची / वृत्तसंस्था
समुद्रात ड्रग्जची आणखी एक मोठी खेप डीआरआयच्या मदतीने तटरक्षक दलाने जप्त केली आहे. लक्षद्वीपजवळील समुद्रात ऑपरेशन खोजबीन अंतर्गत 1,526 कोटी किमतीचे 218 किलो हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी बोटींमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यातील प्रवाशांची डीआरआय आणि कोस्ट गार्डच्या अधिकाऱयांकडून चौकशी सुरू आहे. लक्षद्वीपजवळील समुद्रातून ड्रग्जची मोठी खेप भारताच्या सीमेवर पोहोचणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. त्यानंतर डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
डीआरआयने भारतीय तटरक्षक दलाची मदत घेत आयसीजीएस-सुजित या कोस्ट गार्ड जहाजावर डीआरआय अधिकारी तैनात केले होते. विशेष तपास अधिकाऱयांमार्फत अरबी समुद्रातील बोटींवर पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली होती. 18 मे रोजी डीआरआयने तटरक्षक दलाच्या मदतीने प्रिन्स आणि लिटल-जिसस या दोन संशयास्पद बोटींची झडती घेतली. यावेळी जहाजात प्रत्येकी एक किलोची 218 पाकिटे सापडली. ही सर्व पाकिटे अवैध हेरॉईनने भरलेली होती. चौकशीत दोन्ही बोटींच्या कर्मचाऱयांनी ड्रग्जची ही खेप समुद्रातच मिळाल्याचे सांगितले. ड्रग्ज मिळाल्यानंतर डीआरआय आणि तटरक्षक दलाने बोटी कोचीला आणल्या आहेत. हेरॉईनची ही खेप कुठून आली आणि ती भारतात कुठे पाठवली जाणार होती, याचा शोध घेण्यासाठी अटक केलेल्या क्रू मेंबर्सची चौकशी केली जात आहे.
गेल्या बारा दिवसांपासून पाळत
गुप्त माहितीच्या आधारावर डीआरआय आणि कोस्ट गार्ड गेल्या 12 दिवसांपासून समुद्रात येणाऱया प्रत्येक बोटीवर लक्ष ठेवून होते. 18 मे रोजी डीआरआय आणि कोस्ट गार्डला लक्षद्वीपच्या समुद्रात दोन हिरव्या रंगाच्या संशयास्पद बोटी दिसल्या. कोस्ट गार्ड आणि डीआरआयने बोटीचा तपास केला असता बोटीच्या खालच्या भागात पांढऱया रंगाच्या अमली पदार्थांनी भरलेल्या गोण्या आढळल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षभरात डीआरआयने तस्करीसाठी समुद्रात आणले जाणारे सुमारे 25 हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.