कोल्हापूर :
पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे लोकांचा कल वाढत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात 2024 या वर्षात 15 हजार इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. 2023 या वर्षात ही संख्या 10,312 इतकी होती.
पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांतून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. यामुळे प्रदूषण थांबवण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणली आहेत. पेट्रोल,डिझेलच्या तुलनेत मायलेजच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहने परवडणारी असल्याने ही वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. 2023 या वर्षात जिल्ह्यात 10,312 इतकी इलेक्ट्रिक वाहने होती. तर 2024 या वर्षात त्यामध्ये पाच हजार वाहनांची वाढ झाली. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 11,277 आणि इचलकरंजी उप–प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 3,767 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे.








