कृष्णात पुरेकर कोल्हापूर
कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना राज्य शासनाने मातृ सुरक्षा दिनी मानधनवाढीची भेट दिली आहे. 1 एप्रिलपासून मासिक 1500 रूपयांच्या मानधनवाढीची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी 507.77 कोटीची तरतूद शासनाने केली आहे. यासंदर्भात शासन आदेशही झाल्याने आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी याचे स्वागत केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली आहे. तसेच 500 रूपये कोरोना प्रोत्साहन भत्ताही त्यांना मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविकांना केंद्राच्या 78 सेवांपैकी नियमित 4 सेवांसाठी मासिक 2 हजार रूपये मानधन दिले जाते. राज्य शासनाकडून शासन निधीतून 3 हजारांइतका मोबदला देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये दरमहा अनुक्रमे आशांना 1 हजार आणि गटप्रर्वतकांना 1200 रूपये मानधनात वाढ केली आहे. राज्याकडून आता 500 रूपये प्रतिमहा कोविड भत्ता देण्यास मान्यता देली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना महिना 6500 रूपये मोबदला अदा करण्यात येतो. गटप्रवर्तकांना राज्याकडून 4700 रूपये, केंद्राकडून 8775 रूपये असे 13475 रूपये देण्यात येतात.
कोरोनाचे सावट अद्यापी असल्याने आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना मानधनवाढीचा निर्णय राज्याच्या 17 मार्च 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामध्ये आशा स्वयंसेविका आणि गटप्रर्वतकांच्या मानधनात दरमहा 1500 रूपये वाढीला मंजुरी मिळाली. प्रस्तावित वाढ 1 एप्रिल 2023 पासून त्यांना मिळणार आहे. त्यासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये अंदाजे 507.77 कोटी रूपये वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता दिली आहे.
किमान वेतनापर्यत आणण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह
आशा, गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या राज्य समन्वयक नेत्रदीपा पाटील म्हणाल्या, राज्यात 71 हजार आशा स्वंयसेविका आणि 3 हजार 671 गटप्रवर्तक आहेत. जिल्ह्यात 3 हजार आशा स्वयंसेविका असून 14dर1 गटप्रर्वतक आहेत. आशा स्वयंसेविकांच्या संघटीत आंदोलनामुळे ही मानधनवाढ मिळाली आहे. 2021 नंतर केद्रांचा 500 रूपये कोरोना प्रोत्साहन भत्ता थांबला होता. राज्य शासनाने 500 रूपये प्रोत्साहन भत्ता दिला आहे. या निर्णयामुळे गटप्रवर्तकांना किमान वेतनावर आणले आहे. आशांना किमान वेंतन पातळीवर आणले आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाल्याने त्यांना मातृ सुरक्षा दिनाची ही भेटच मिळाली आहे.









