बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार सुरू
चिकोडी : लग्न सोहळ्यातील जेवणाचे सेवन केल्याने विषबाधा होऊन 150 हून अधिकजण अत्यवस्थ झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथे मंगळवारी सकाळी घडली. त्यामुळे आरोग्य खाते प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेतील 87 रुग्णांना चिकोडी व एकसंबा येथील सरकारी इस्पितळात 55 जण उपचार घेत आहेत तर अनेकजण मिरजसह बेळगावच्या जिल्हा इस्पितळात उपचार घेत आहेत. हिरेकुडी येथे सोमवारी झाकीर पटेल यांच्या मुलीचा मिरज येथील मुलाशी लग्नसोहळा पार पडला. लग्नात जेवण करून नागरिक आपापल्या घरी गेले. त्यानंतर मंगळवारी सकाळी लग्नाला उपस्थित लोकांना उलटी व जुलाब व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर चिकोडी सरकारी इस्पितळात 87 जणांवर उपचार केले जात आहेत. यात लहान मुले, वृद्ध, महिलांचा समावेश आहे. तसेच एकसंबा शहरातील सरकारी इस्पितळात 55 जणांवर उपचार सुरू आहेत.
हिरेकुडी येथे झालेल्या लग्न सोहळ्याला वरपक्षाकडील अनेक लोक आले होते. त्यांना देखील मंगळवारी सकाळी उलटी, जुलाब व इतर लक्षणे दिसून आल्याचे समजते. सदर घटनेची माहिती कळताच आमदार गणेश हुक्केरी यांनी चिकोडीत दाखल होऊन इस्पितळाला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टरांना औषधांची कमतरता किंवा इतर व्यवस्थेविषयी विचारणा केली. यावेळी बेड कमी पडत असल्याचे सांगितल्याने निपाणी व कब्बूर येथून 25 बेड त्वरित घेऊन येण्याची सूचना केली. सर्व रुग्णांना त्यांच्या अन्नपूर्णेश्वरी फौंडेशनकडून फळे व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी सर्व रुग्णांवर योग्य उपचार करावेत अशी आमदार गणेश हुक्केरी यांनी सूचना केली. त्यानंतर आमदार हुक्केरींनी एकसंबा व हिरेकोडी येथे भेट दिली. यावेळी बेळगाव जिल्हा पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रांताधिकारी माधव गीते यांच्यासह तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी एस. एस. गडेद यांनी चिकोडी, एकसंबा इस्पितळ व हिरेकुडी गावाला भेट दिली.
मांसाहारी जेवणातून बाधा
हिरेकुडी गावात मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. गावात पथक तैनात असून वैद्यकीय खात्याकडून नागरिकांची तपासणी केली जात आहे. यावेळी शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणाची सोय केली होती. पण यात मांसाहारी जेवण सेवन केलेल्यांना विषबाधा झाल्याचे समजते.









