नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावर टोलनाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता फास्टॅग लावण्याची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 1 जानेवारी 2021 पर्यंत होती. आता वाहनचालकांना 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या वाहनांमध्ये फास्टॅग लावता येईल. या निर्णयामुळे केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारने टोलनाक्मयावर टोलवसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी चार चाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. पण, वाहन चालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱया अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.
15 फेब्रुवारी 2021 पासून प्रत्येक चारचाकी वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्मयांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ या दोन्ही गोष्टी वाचतील. फास्टॅग अकाउंटमधून टोलचे पैसे वजा झाले की संबंधित वाहनचालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅग स्टिकरची वैधता पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.









