अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक : ऑनलाईन वादविवादात सहभागी होण्यास ट्रम्प यांचा नकार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी होणाऱया 3 वादविवाद कार्यक्रमांपैकी दुसरा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कमिशन ऑफ डिबेटने (सीपीडी) याची पुष्टी दिली आहे. दुसरा वादविवाद 15 ऑक्टोबर रोजी मियामी येथे होणार होता. तिसरा आणि अखेरच वादविवाद 22 ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असून त्यासंबंधी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही.
पहिला वादवाद 29 सप्टेंबर रोजी पार पडला आहे. मागील आठवडय़ात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. ट्रम्प हे 3 दिवसांपर्यंत मेरीलँडच्या सैन्य रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी ते व्हाइट हाउसमध्ये परतले असून स्वतःला त्यांनी तंदुरुस्त संबोधिले आहे.
संघर्ष टाळण्याचा प्रयत्न
सीपीडीने दुसरा वादविवाद ऑनलाईन करविण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु ही केवळ वेळेची नासाडी होणार असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी नकार दिला होता. तर दुसरीकडे डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार ज्यो बिडेन यांनी ट्रम्प हे कोरोना निगेटिव्ह असल्याची पुष्टी सर्वप्रथम मिळावी अशी मागणी केली होती. दोघांमधील संघर्ष पाहता सीपीडीने वादविवादच रद्द केला आहे.
सीपीडीची भूमिका
सीपीडीच अध्यक्षीय आणि उपाध्यक्षीय वादविवादांचे आयोजन करते. मुद्दे तसेच स्थळही सीपीडीकडूनच निश्चित करण्यात येते. परंतु ट्रम्प आणि बिडेन यांच्यातील राजकीय संघर्ष पाहता सीपीडीने दुसरा वादविवाद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 ऑक्टोबर रोजी होणाऱया तिसऱया आणि अंतिम वादविवादाची पूर्ण तयारी करण्याचा प्रयत्न असल्याचे सीपीडीने म्हटले आहे.
ट्रम्प बेजबाबदार
दुसऱया वादविवादासाठी पूर्णपणे तयार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. परंतु सीपीडीने बिडेन यांच्या मागणीवर वादविवाद ऑनलाईन स्वरुपात करण्याचा प्रस्ताव मांडला असता ट्रम्प यांनी तो फेटाळला आहे. आमचे अध्यक्ष अखेर काय इच्छितात हेच मी जाणत नाही. त्यांचा मेंदू दर सेकंदाला बदलतो, ते अत्यंत बेजबाबदार वर्तन करतात. मी केवळ सीपीडीचे म्हणणे मानणार असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
विजयाचा विश्वास
डेमोक्रेट्स अत्यंत सहजपणे विजय नोंदविणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर ट्रम्प यांच्या वर्तनात मी अनेक बदल अनुभवले आहेत. ते जितके दिवस अध्यक्षपदावर राहतील, तेवढेच दिवस अशाच प्रकारे बेजबाबदार वर्तन करत राहणार असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.