वृत्तसंस्था/ ढाका
येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु असलेल्या बांगलादेश वि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामधील पहिल्या दिवसाचा खेळ गोलंदाजांच्या नावे राहिला. पहिल्या दिवसात एकूण 15 विकेट्स गेल्या. या 15 पैकी 13 विकेट्स या स्पिन गोलंदाजांनी घेतल्या. बांगलागदेश टीम आधी 172 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने 12.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 55 धावा केल्या. अद्याप ते 115 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस डॅरेल मिचेल 15 तर ग्लेन फिलिप्स 5 धावांवर खेळत होते.
ढाक्यातील खेळपट्टी ही कायमच फलंदाजांसाठी डोकेदुखी आणि गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आली आहे. यजमान बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना बांगलादेशची दाणादाण उडवली. मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स आणि एजाज पटेल या तिघांनी मिळून 8 विकेट्स घेतल्या. मुशफिकुर रहिमने 35 आणि शहादत हुसेनने 31 धावा केल्या. या दोघांनाच बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करता आल्या. तसेच मेहदी हसन याने 20 धावा जोडल्या. मात्र इतर फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. त्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव हा 66.2 ओव्हरमध्ये 172 धावांवर आटोपला.
न्यूझीलंडचीही पडझड
बांगलादेशला झटपट गुंडाळल्यानंतर न्यूझीलंड टीम मोठी आघाडी घेण्याच्या तयारीने मैदानात आली. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानावर खेळताना जोरदार कमॅबक केले. टॉम लॅथम 4 आणि डेव्हॉन कॉनव्हे 11 धावा करुन आऊट झाले. केन विल्यम्सन 13, हॅन्री निकोलस 1 आणि टॉम ब्लंडेल 12 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे न्यूझीलंडचा स्कोअर हा पहिल्या दिवसअखेर 5 विकेट्स गमावून 55 असा राहिला. मिचेल 12 आणि फिलिप्स 5 धावांवर नाबाद राहिले. किवीज संघ 117 धावांनी पिछाडीवर असून शेर ए बांगलाच्या स्टेडियमवर आजचा दुसरा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. बांगलादेशकडून मेहदी हसनने 3 तर तैजूल इस्लामने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 66.2 षटकांत सर्वबाद 172 (मुशफिकुर रहीम 35, शहादत हुसेन 31, मेहदी हसन मिराज 20, नईम हसन नाबाद 13, सँटेनर व फिलिप्स प्रत्येकी 3 बळी)
न्यूझीलंड प.डाव 12.2 षटकांत 5 बाद 55 (लॅथम 4, कॉनवे 11, ब्लंडेल 12, मिचेल खेळत आहे 12, फिलिप्स खेळत आहे 5, मेहदी हसन 3 तर तैजुल इस्लाम 2 बळी).
बांगलादेशचा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद
नुकत्याच झालेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत अँजेलो मॅथ्यूजचा टाईम आऊटचा विषय चांगलाच चर्चेत राहिला होता. ज्या संघाविरुद्ध मॅथ्यूज टाईम आऊट झाला होता तो बांगलादेश होता. आता बांगलादेशी संघाचा खेळाडू ही अशाच विचित्र पद्धतीने आऊट झाला. ढाका येथे न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम ‘बॉल हाताळणे‘ याचा बळी ठरला. यासोबतच कसोटी फॉरमॅटमध्ये या नियमानुसार बाद होणारा तो बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशच्या डावातील 41 व्या षटकात हा संपूर्ण प्रकार घडला. कायल जेमिसन या षटकात गोलंदाजी करत होता. पहिल्या तीन विकेट्स स्वस्तात गमावल्यामुळे रहीम संयमी खेळी करत होता. या षटकातील एक चेंडू रहीमच्या बॅट लागून हवेत स्पिन होत होता. चेंडूचा टप्पा खाली पडताच तो थेट स्टंप्समध्ये जाणार, हे रहीमच्या लक्षात आले. पण रहीमने आपली विकेट वाचवण्यासाठी उजव्या हाताने चेंडू अडवला. रहीमने केलेला प्रकार पाहून गोलंदाज जेमिसनसह न्यूझीलंड संघाकडून विकेटसाठी अपील केली गेली. मैदानी पंचांनी आपापसात चर्चा करून निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. रिप्लेमध्ये घडला प्रकार पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी मात्र रहीमला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्ड नियमानुसार बाद घोषित केले.
नियम काय सांगतो
रहीमने ज्या पद्धतीने विकेट गमावली, त्याला 2017 आधी हँडलिंग द बॉल असे म्हटले जात होते. पण नंतर क्रिकेट नियमांमध्ये बदल झाल्यामुळे अशा प्रकारच्या विकेटला ऑबस्ट्रक्टिंग द फिल्डमध्ये बोलले जाऊ लागले. या नियमानुसार फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने चेंडू हाताने अडवला तर तो बाद असतो. फलंदाजाने चेंडूला हात लावण्याआधी पंच किंवा विरोधी संघाची परवानगी घेणे अपेक्षित आहे. विरोधी संघाला चेंडू परत देण्याच्या हेतूने जरी फलंदाजाने चेंडूला हात लावला, तरीही अपील केल्यानंतर त्याला विकेट गमवावी लागू शकते.









