रत्नागिरी :
तालुक्यातील फणसवळे कोंडवाडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून १५ तोळे सोन्यासह २९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. स्वरुप माने यांच्या मालकीचे हे घर असून याप्रकरणी त्यांची पत्नी मनाली माने हिने रत्नागिरी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली.
स्वरुप सोनू माने हे फणसवळे कोंडवाडी येथे राहतात. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी मुलगा एमआयडीसीत तर स्वरुप माने हे मजुरीसाठी गेले होते. पत्नी शेतात कामाला गेली होती. दुपारी १२.३० च्या सुमारास चोरट्याने घराच्या मागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला. चोरट्याने घरातील कोयतीने टंक फोडला. तसेच एक सुटकेसदेखील फोडली. ट्रंकमध्ये असलेले १५ तोळे सोन्याचे दागिने आणि २९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शेतात कामावर गेलेली स्वरुप यांची पत्नी मनाली घरी आली. यावेळी तिने त्या खोलीकडे पाहिले असता खोलीत सर्व कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. तिने पुढे जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनाली हिने आरडाओरड सुरू केली. तिच्या आवाजाने शेजारचे लोक घराकडे धावत आले. सर्वांना हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ ग्रामीण पोलीसांना संपर्क साधला व घडल्या प्रकाराची माहिती दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून त्यांनी मनाली यांची फिर्याद घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.








