उत्तराखंडमधील नमामि गंगे प्रकल्पात दुर्घटना : जखमींना एअरलिफ्ट करून एम्समध्ये हलवले
वृत्तसंस्था/ गोपेश्वर, देहराडून
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये बुधवारी वीजेच्या धक्क्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एक पोलीस निरीक्षक आणि 5 होमगार्डचा समावेश आहे. तसेच अन्य सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. जखमींना एअरलिफ्ट करून एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
नमामि गंगे प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमध्ये सध्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चमोली येथील प्रकल्पस्थळी बांधकाम सुरू असताना रेलिंगच्या धातुच्या पट्ट्यांमधून वीजप्रवाह पसरल्याने तब्बल 22 जणांना वीजेचा धक्का बसला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून अन्य सातजण जखमी आहे. गंभीररित्या जळालेल्या मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी वेळीच बचावकार्य सुरू केले.
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पस्थळी रेलिंगमध्ये विद्युत प्रवाह पसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याठिकाणी काम करणारे सर्व मजूर वीजप्रवाहाच्या कचाट्यात आले. चमोली दुर्घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. तात्काळ पोलीस आणि प्रशासनाच्या पथकाने गंभीररीत्या भाजलेल्या लोकांना ऊग्णालयात दाखल केले. दुर्घटनेत अनेक जण भाजले आहेत. अलकनंदा नदीच्या काठावरील ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाल्यानंतर विद्युत प्रवाह सुरू झाल्याने हा अपघात झाल्याचे चमोलीचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोवाल यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेत बद्रीनाथ महामार्गावर तैनात असलेल्या एका पोस्ट प्रभारीचाही मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
या अपघातानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऊर्जा महामंडळाने निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले आहे. नमामि गंगे प्रकल्पाशी संबंधित अधिकारी आणि तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून पाहणी करून सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.









