मनपाकडून मोहीम तीव्र, दुकानदारांना दणका
बेळगाव : बेकायदेशीररित्या कब्जा घेऊन ठाण मांडलेल्या महापालिकेच्या गाळेधारकांविरोधात जोरदार मोहीम महापालिकेने उघडली आहे. बुधवारी 6 दुकानांचा ताबा घेतला होता. तर गुरुवारी सीबीटी येथील 15 गाळ्यांचा ताबा घेतला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून बेकायदेशीर गाळेभाडेकरुंना धडकी भरली आहे. याचबरोबर महात्मा फुले आणि कोलकार मार्केट येथील गाळेधारकांनाही समज देण्यात आली असून आठवड्याच्या आत भाडे भरा, अन्यथा दुकान खाली करा, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मोहीम सुरू केली आहे. गाळ्यांचा लिलाव होऊनदेखील त्यांचा ताबा महापालिकेकडे देण्यात आला नव्हता. जुनेच भाडेकरू त्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून एकही कारवाई झालेली नव्हती. मात्र आता या कारवाईला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी सीबीटी येथील 15 दुकाने ताब्यात घेतली आहेत. याचबरोबर नव्याने लिलावात घेतलेल्या भाडेकरुंना ती दुकाने सुपूर्द करण्यात येणार आहेत. गुरुवारी सीबीटी येथील गाळ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर महात्मा फुले आणि कोलकार मार्केट येथे जाऊन थकीत भाडे असलेल्या गाळेधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. महसूल निरीक्षक नंदू बांदिवडेकर, चंद्रू मुरारी, सुरेश आलूर यांनी ही कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.









