के. एल. राहुल, इशान किशनला संधी, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमनसला डावलले
प्रतिनिधी/ पल्लेकेले (श्रीलंका)
यष्टिरक्षक-फलंदाज के. एल. राहुलची मंगळवारी घोषित झालेल्या भारताच्या 15 सदस्यीय विश्वचषक संघात वर्णी लागलेली आहे. राहुलच्या तंदुरुस्तीवर नजर असली, तरी अपेक्षेप्रमाणे त्याला संधी मिळाली आहे. कारण निवड समितीने सदर महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सात फलंदाज आणि चार अष्टपैलू खेळाडू असे समीकरण राखण्यास पसंती दिलेली आहे.
धोंडशिरेच्या दुखापतीमुळे राहुल काही महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. तो सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील संघाचा भाग आहे, परंतु अद्याप एकाही सामन्यात तो खेळलेला नाही. आशिया चषकापूर्वी त्याला झालेल्या त्रासामुळे त्याचे पुनरागमन लांबले आहे. ज्यांच्या तंदुरुस्तीबाबत काही समस्या होत्या ते तिन्ही खेळाडू परत आले आहेत. राहुल सध्या चांगल्या स्स्थितीत दिसत आहे. या विश्वचषकासाठी हा सर्वोत्तम संतुलित संघ आहे असे आम्हाला वाटते, असे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी म्हटले आहे.
राहुल खरोखरच चांगल्या स्थितीत दिसत होता. परंतु आशिया चषकाच्या अगदी आधी त्याला जरा त्रास होऊ लागला. त्याने त्यावर मात केली आहे. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो उपलब्ध झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे, असेही आगरकर यांनी म्हटले आहे.
भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे. आशिया चषकातील संघाचा भाग असलेले वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि डावखुरा फलंदाज तिलक वर्मा यांना विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळालेले नाही. इशान किशनने आणि चांगली कामगिरी करता न येऊनही सूर्यकुमार यादवने संघात जागा मिळवली आहे, तर आशिया चषकासाठीच्या भारताच्या संघातील राखीव खेळाडू असलेल्या संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे.
जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील, तर फिरकी माऱ्याचे नेतृत्व डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव करेल. कुलदीपला रवींद्र जडेजाची साथ मिळेल. त्याशिवाय तिसरा फिरकीपटू म्हणून डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला प्राधान्य देण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीने होईल. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरु द्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे.
संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.