नगराध्यक्षांनी दिलेली माहिती : थकबाकी वसुलीसाठी खास मोहीम
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने थकबाकी वसुलीसाठी खास मोहीम हाती घेतली असून मागील दोन दिवसांत काही तासांमध्ये सुमारे 15 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. आपण थकबाकी वसुलीत खास लक्ष घातले असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिकेकडे असलेल्या तीन मार्केट निरीक्षकांपैकी सोमवारपासून एका निरीक्षकाला पालिकेत उत्पन्नाचे दाखले देणे व अन्य कामांसाठी बसविण्यात आले आहे. अन्य दोन निरीक्षकांना मडगाव पालिकेची कर थकबाकी, जी जवळपास 35 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे, त्याची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी सोमवारपासून हाती घेतलेल्या खास मोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली. वसुली अधिकारी थेट आस्थापनाच्या मालकाकडे जाऊन ही मोहीम राबवत आहेत. त्यांना दोन मार्केट निरीक्षक सहकार्य करत आहेत. ही मोहीम दीर्घकाळ सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले.
शिरोडकर यांनी कामचुकार कर्मचाऱयांवर तसेच कर्मचारी वेळेवर कामावर येतात की नाही हे पाहण्यासाठी हजेरीपटावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्षांनी मागील काही वर्षे ’बीएलओ’ म्हणून पालिकेचे काही कर्मचारी काम पाहत असल्याने पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याने त्यातील 3 कर्मचाऱयांना ‘बीएलओ’च्या डय़ुटीतून मुक्त करून घेतले आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱयांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी या कर्मचाऱयांना बीएलओच्या जबाबदारीतून मुक्त करून घेतल्याचे सांगण्यात आले आहे.









