रुग्णालयावर इस्रायलचा दुहेरी क्षेपणास्त्र हल्ला
वृत्तसंस्था/ गाझा सिटी
दक्षिण गाझामधील नसर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात तीन पत्रकारांसह 15 जण ठार झाले. मृतांमध्ये अल जझीरा आणि रॉयटर्सचे पत्रकार होते. हा हल्ला ‘डबल-टॅप’ हल्ला होता, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यात सलग दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे बचावकार्य अधिक धोकादायक बनले. इस्रायली सैन्याने अद्याप या हल्ल्यावर कोणतेही विधान केलेले नाही. तथापि, इस्रायलने यापूर्वी रुग्णालयांवरील हल्ल्यांचे समर्थन करताना हमास दहशतवादी तेथे कमांड अँड कंट्रोल सेंटर चालवत असल्याचा दावा केला होता.
कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स (सीपीजे) च्या मते, इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत एकूण 192 पत्रकार मारले गेले आहेत. तर काही माध्यमांच्या वृत्तानुसार 200 हून अधिक पत्रकार मारले गेले आहेत. या युद्धाच्या तुलनेत रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत 18 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल-गाझा संघर्षात आतापर्यंत 62,686 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अंदाजानुसार, मृतांपैकी निम्मे महिला आणि मुले असल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.









