भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील रीवा जिह्यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण धडकेत 15 जणांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये दिवाळीसाठी घरी जाणाऱया 14 प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच या अपघातात 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. या दुर्घटनेबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त करत सर्व जखमींना योग्य वैद्यकीय मदत पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱया राष्ट्रीय महामार्ग-30 वर रिवाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त खासगी बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. बसमधील सर्व प्रवासी कामगार असून ते दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या घरी जात होते.









