15 जूनपासून पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्या धावणार
By : राजू चव्हाण
रत्नागिरी (खेड) : कोकण मार्गावर दरवर्षी 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्या धावणार आहेत. रेल्वेगाड्यांच्या वेगमर्यादेचा कालावधीही कमी करण्यात आला असून 31 ऐवजी 20 ऑक्टोबरपर्यंतच रोहा ते ठोकूरपर्यंत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर निर्बंध राहणार आहेत.
6 एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपातही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेची निश्चितीही करण्यात आली आहे. कोकणात पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पर्जन्यवृष्टीसह डोंगराळ भागामुळे कोकणातून जाणारा रेल्वेमार्ग धोक्याचाच गणला जात होता.
गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर घडणाऱ्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब करत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. आजवर प्रवाशांची सुरक्षितताही अबाधित राखण्यात कोकण रेल्वे प्रशासन यशस्वी ठरले आहे.
मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर विपरित परिणाम होवून रेल्वेगाड्या विलंबाने धावतात. कोकण मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजनाची आखणी सुरू केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यात कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगांवर मर्यादा घालण्याची निश्चितीही केली आहे. दरवर्षी 10 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात. रोहा ते ठोकूरदरम्यान रेल्वेगाड्या ताशी 120 ऐवजी 75 कि.मी.च्या वेगाने धावतात.
मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर गाड्यांचा वेग ताशी 40 कि.मी. असतो. यामुळे प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागतो. यंदा 15 जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 31 ऐवजी 20 ऑ क्टोबरपर्यंतच रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा राहणार आहे. एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही कपात पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.
सीएसएमटी–वंदे भारत एक्स्प्रेस 16 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत 6 दिवसांऐवजी सोमवार, बुधवार व शुक्रवारी धावेल. 17 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान 22230 क्रमांकाची सीएसएमटी–मडगाव एक्स्प्रेस 17 जून ते 19 ऑक्टोबरदरम्यान मंगळवार, गुरुवार, शनिवारी धावेल.
22119 क्रमांकाची मडगाव–सीएसएमटी मंगळवार, गुरुवार, शनिवार तर 22120 क्रमांकाची मडगाव–सीएसएमटी बुधवार, शुक्रवार, रविवारी धावेल. 11099क्रमांकाची एलटीटी–मडगाव शुक्रवार व रविवारी तर 11100 क्रमांकाची मडगाव–एलटीटी शनिवार व सोमवारी धावेल.








