संभाव्य चाराटंचाईचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्याला 750 मेट्रिक टन चाऱ्याचा होणार पुरवठा
बेळगाव : जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेत 15 कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. शिवाय 15 तालुक्यांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. यंदा पावसाअभावी चाराटंचाई निर्माण होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आतापासूनच पावले उचलली आहेत. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, घोडा, गाढव, बैल आदींचा समावेश आहे. या जनावरांना दैनंदिन चाऱ्याची गरज भासते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाऱ्याचा तुटवडा भासू नये, यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ज्यांच्याकडे चारा उपलब्ध आहे त्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पशुसंगोपन खात्याने सद्यस्थित 16 लाख मेट्रिक टन चारासाठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. पुढील दोन-तीन महिने पुरेल इतका चारासाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन चाऱ्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे सुक्या व ओल्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत साखर कारखाने सुरू असल्याने काही प्रमाणात ओला चारा मिळू लागला आहे. मात्र सौंदत्ती, यरगट्टी, रामदुर्ग आदी भागात चाराटंचाईची समस्या आतापासूनच भेडसावू लागली आहे.
प्रशासनाची धडपड सुरू
खात्यामार्फत चारा उपलब्ध व्हावा यासाठी दर्जेदार बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुढील धोका लक्षात घेऊन चारासाठा करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. चाऱ्याबरोबरच उन्हाळ्यात पाण्याचे संकटही निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला चारा छावण्या सुरू करण्याची गरज भासणार आहे. जिल्ह्यात 13.93 लाख जनावरांची संख्या आहे. तर 14.50 लाख शेळ्या, मेंढ्या आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी किमान सहा किलो चारा मिळणे गरजेचे आहे. तर शेळ्या, मेंढ्यांना अर्धा किलो चारा उपलब्ध करणे आवश्यक आहे. जनावरांना पाणी संकट ओढावू नये यासाठी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. पाणीपुरवठ्यासाठीही निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूणच संभाव्य चारा आणि पाणीटंचाईसाठी प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
निविदा प्रक्रियेला सहकार्य करा – डॉ. राजीव कुलेर, सहसंचालक पशुसंगोपन खाते
जिल्ह्यात पुढील तीन महिने पुरेल इतका चारासाठा आहे. मात्र खबरदारी म्हणून चारा पुरवठ्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे चारा उपलब्ध आहे त्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन सहकार्य करावे. चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
जूनपर्यंत पुरेल इतका चारासाठा करणार – जिल्हाधिकारी नितेश पाटील
जिल्ह्यातील 15 तालुक्यांना चारा पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. प्रतिटनासाठी दर निश्चित करण्यात आला आहे. पुढील पावसाळा म्हणजेच जूनपर्यंत पुरेल इतक्या चाऱ्यासाठ्याचे संकलन केले जाणार आहे.