वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निधी गोळा करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून गेल्या एका महिन्यात पक्षाला 15 कोटी रुपये मिळाले असल्याचे काँग्रेसने शुक्रवारी सांगितले. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन देणगी एकत्र करण्यासाठी ‘डोनेट फॉर देश’ नावाने अभियान सुरू केले होते. त्यानंतर 31 दिवसांत पक्षाने 15 कोटी रुपये जमा केल्याचे पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी सांगितले. एकंदर तीन लाखांहून अधिक वैध व्यवहारांद्वारे ही रक्कम प्राप्त झाली आहे.
राजस्थान, तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पंजाब ही राज्ये निधी मिळवून देण्यात आघाडीवर आहेत. काँग्रेसला उत्तर प्रदेशमधून 75 लाख 88 हजार 676 तर उत्तराखंडमधून 12 लाख 32 हजार 422 ऊपये मिळाले आहेत. यावषी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षासाठी संसाधने उभारणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.









