उज्जैनमधील कारवाईत आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश : सात देशांचे चलनही सापडले : आधुनिक उपकरणेही हस्तगत
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये सट्टेबाजांवर कारवाई करत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून टी-20 क्रिकेट विश्वचषकावर सट्टा लावणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. या काळात अनेकांना अटक करण्यात आली असून कोट्यावधी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी बेटिंगमध्ये वापरलेली आधुनिक उपकरणेही जप्त केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि पंजाबमधील बुकींना पकडले आहे.
उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सट्टेबाजांच्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सट्टेबाजांविऊद्ध उज्जैन पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून त्यामध्ये 15 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल फोन आणि इतर आधुनिक उपकरणेही जप्त केली आहेत. रोकड मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची मोजणी करण्यासाठी मशीनचा वापर करावा लागला.
परकीय चलनही सापडले
15 कोटींशिवाय मौल्यवान वस्तू आणि विदेशी चलनही जप्त करण्यात आल्याचे उज्जैन पोलिसांनी सांगितले. शहरात मोठ्या प्रमाणावर क्रिकेट सट्टा खेळला जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे नीलगंगा पोलिसांनी महामृत्युंजय गेटसमोरील घरावर छापा टाकला. या घरातून 9 जणांना अटक करण्यात आली. याचदरम्यान मुख्य संशयित पियुष चोप्रा फरार झाल्याची माहिती उज्जैनचे आयजी संतोष कुमार सिंह यांनी दिली. तो उज्जैनच्या मुसद्दीपुरा भागातील रहिवासी आहे. त्याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी रोख रक्कम जप्त केली आहे.
सट्टेबाज प्रकरणातील मुख्य बुकी पियुष चोप्रा याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये अन्य राज्यातील बुकींचाही समावेश असून जसप्रीत, गुरप्रीत, सत्यप्रीत, चेतन हे पंजाबचे रहिवासी आहेत. तर रोहित, मयूर जैन, आकाश आणि गौरव हे मध्यप्रदेशमधील नीमच येथील रहिवासी आहेत. आरोपींपैकी हरीश हा निंबाहेरा राजस्थानचा रहिवासी आहे. सदर आरोपी देशभरात ऑनलाईन बेटिंग चालवत होते.
41 मोबाईल, 19 लॅपटॉपही जप्त
छापा टाकून पोलिसांनी 41 मोबाईल फोन, 29 लॅपटॉप, एक आयपॅड, दोन पेन ड्राईव्ह, व्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सिमकार्डसह संपर्क साधने जप्त केली. बेटिंगच्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या टीमला बक्षीस दिले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले. आरोपींकडून 14 कोटी 58 लाख रुपयांच्या भारतीय चलनाशिवाय विदेशी चलन आणि चांदीच्या मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.









