प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका कधीही लागू शकतील, असे सध्या चित्र असून जिल्ह्यातील विद्यमान सदस्यांना आपल्या गटात विकास कामे कशी जास्त पडतील, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे असतानाच जिल्हा परिषदेत पंधराव्या वित्त आयोगातून 2020-21 च्या आर्थिक वर्षात अबंधित निधीतून 2 कोटी 85 लाखांची पाणी पुरवठा योजनेची तब्बल 90 कामे कामे मंजूर करण्यात आली. परंतु या कामांमध्ये पदाधिकाऱ्यांचा वाटा मोठा नसल्याने ही सर्वच रद्द करण्याचा कट सध्या जिल्हा परिषदेत शिजत आहे.
जिल्हा परिषदेत काही अधिकाऱ्यांकडून सदस्यांना विचारात न घेता त्यांच्या गटातील कामे टाकण्याचा फंडा सुरु आहे. त्यास सदस्यांकडून विरोध होत नाही. परंतु गटात टाकलेले काम मंजूर होवूनही पुन्हा ते रद्द करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यामुळे नाराजी व्यक्त होवू लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेतच ग्रामपंचायत विभागातून 15 व्या वित्त आयोगातून 90 कामे मंजुर कामे करण्यात आली. त्या कामांमध्ये जावली तालुक्यातील 3 कामे, वाई तालुक्यातील 5 कामे, सातारा तालुक्यातील 8 कामे, फलटण तालुक्यातील 13 कामे, महाबळेश्वर तालुक्यातील 3 कामे, माण तालुक्यातील 9 कामे, कोरेगाव तालुक्यातील 9 कामे, खटाव तालुक्यातील 9 कामे, खंडाळा तालुक्यातील 3 कामे, कराड तालुक्यातील 10 कामे, पाटण तालुक्यातील 16 कामे अशी 90 कामे 2 कोटी 85 लाख रुपयांची असून ही कामे पाणी पुरवठा योजनांची आहेत. ही कामे आता सुरु होण्याच्या मार्गावर असताना चक्क जिल्हा परिषदेतील काही पदाधिकाऱ्यांकडून आपल्या गटात, आपल्या गावात कामे झाली नसल्याने ही सर्वच कामे रद्द करण्याचा कट सुरु आहे.









