वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशच्या बापटला जिल्ह्यात शुक्रवारी दहावीतील विद्यार्थ्याला जिवंत जाळण्यात आले. उप्पल अमरनाथ असे नाव असलेल्या या विद्यार्थ्यावर पेट्रोल ओतून त्याला आगीच्या हवाली करण्यात आले होते. अमरनाथची हत्या 4 जणांनी केल्याचे समोर आले आहे. चेरुकुपल्ली येथील राजावोलु गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या दिशेने जात असलेल्या विद्यार्थ्याला चार जणांनी रोखल्यानंतर त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला आगीच्या हवाली करण्यात आले. विद्यार्थ्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेतली होती. होरपळलेल्या विद्यार्थ्याला गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, पण विद्यार्थ्याचा जीव वाचू शकलेला नाही.
रुग्णालयात नेतेवेळी विद्यार्थ्याने पोलिसांना एका हल्लेखोराचे नाव सांगितले होते. संबंधित आरोपी हा विद्यार्थ्याच्या बहिणीची छेड काढत होता. याला विद्यार्थ्याने विरोध दर्शविल्यानेच आरोपीने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.









