पप्पू राऊळला 21 पर्यंत वनकोठडी
वार्ताहर / सावंतवाडी:
खवले मांजराच्या तस्करी प्रकरणाचा तपास आता मुख्य टप्प्यावर आला आहे. आणखी चार आरोपी पसार आहेत. माडखोल भागातच खवले मांजराची शिकार करून ते गोव्यात विक्रीसाठी नेण्यात येत होते. त्यासाठी सहकार्य केलेल्या माडखोल येथील पप्पू ऊर्फ मधुकर वसंत राऊळ याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता 21 जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली. खवले मांजराची तस्करी नेमकी कोणत्या हेतूसाठी करण्यात येत होती याचा कसून तपास तपासी अधिकारी गजानन पानपट्टे करत आहेत.
या तस्करी प्रकरणात चौघेजण पसार आहेत. त्यांचे नाव व ठावठिकाण मिळाला आहे. ते इचलकरंजी व लांजा भागातील आहेत. त्यामुळे खवले मांजर तस्करीशी कोल्हापूर कनेक्शन आहे का, याचा शोध घेण्यात येणार आहे. रत्नागिरीत खवले मांजर तस्करी करणारी टोळी सापडली. त्यानंतर दुसऱयाच दिवशी सावंतवाडीत माडखोल येथे स्थानिक गुन्हा अन्वेषणने खवले मांजर विक्रीसाठी नेणाऱया टोळीला जेरबंद केले. या टोळीत कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी आदी भागातील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूरचे रॅकेट गुंतल्याचे सम्घेर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या रॅकेटचा संबंध आहे का? मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.
माडखोल जंगलात शिकार
खवले मांजराची माडखोल परिसरातील जंगलात शिकार करण्यात आली असावी, असा संशय वनाधिकाऱयांना आहे. मात्र, अटकेत असलेले आरोपी अद्याप माहिती देत नाहीत. नेमके खवले मांजर कोणी व कोठे पकडले, त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेले मधुकर राऊळ (रा. माडखोल) यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच देवसूचे गजानन अर्जुन सावंत यांचा नेमका काय सहभाग आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. एकंदरीत देवसू, माडखोल भागातील स्थानिक लोकांना हाताशी धरून गोव्याच्या रॅकेटने खवले मांजराची शिकार करून तस्करीसाठी नेण्याचा प्रयत्न फसला आहे. आणखी चौघांना ताब्यात घेतल्यानंतरच अनेक बाबी उजेडात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.









