वृत्तसंस्था/ जयपूर
केंद्र सरकारच्या ‘वंदे मातरम’ अभियानांतर्गत विदेशामध्ये अडकलेले राजस्थानचे रहिवासी जयपूरमध्ये दाखल होण्याचे सत्र शुक्रवारपासून सुरू झाले. शुक्रवारी दुपारी थेट लंडनहून विमानाने आलेले नागरिक प्रथम दिल्लीत आल्यानंतर तेथून दुसऱया विमानाने जयपूरमध्ये दाखल झाले. यामध्ये 149 प्रवाशांचा समावेश होता. या सर्व प्रवाशांना विमानतळानजीक असलेल्या हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
क्वारंटाईन करण्यात आलेल्या हॉटेल्सचे भाडे संबंधित विमान प्रवाशांनाच भरावे लागणार आहे. 1 जूनपर्यंत एकूण 13 विमाने देशात दाखल होणार आहेत. ही विमाने ब्रिटन, फिलिपाईन्स, कॅनडा, जॉर्जिया, कझाकिस्तान, रशियाहून भारतात येणार आहेत.
संचारबंदीला मुदतवाढ
शुक्रवारी दुपारच्या सुमारास विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना सुरक्षा दलाने घेराव घातला. त्यानंतर त्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. सर्व प्रवाशांना 20-20 च्या गटाने बाहेर पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना सरळ हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले. राज्यस्थानमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सरकारने 144 कलम लागू केले आहे. काही भागात 30 जूनपर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. गृह विभागाकडून यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.









