सहा संघांकडून 3.9 कोटी रु. खर्च, 18 खेळाडूंना कायम ठेवले
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
‘अल्टिमेट खो खो’च्या (यूकेके) दुसऱ्या मोसमासाठी सहा संघांनी 290 खेळाडूंमधून 145 खेळाडूंची निवड केली आहे. या लिलावात संघांनी 3.9 कोटी ऊपये खर्च केले आणि 18 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले, तर 16 ते 18 वयोगटातील 33 तऊणांनाही संघांत घेण्यात आले. ‘मुंबई खिलाडीज’ यांनी ओडिशातील 16 वर्षीय सुनील पात्राला, तर पुद्दुचेरीच्या 17 वर्षीय एम. मुगिलन आणि महाराष्ट्राच्या 17 वर्षीय गणेश बोरकर यांना अनुक्रमे चेन्नई क्विक गन्स आणि राजस्थान वॉरियर्सनी निवडले आहे.
महाराष्ट्राचा महेश शिंदे हा सलग दुसऱ्या मोसमासाठी पहिली निवड ठरला आहे. या 28 वर्षीय बचावपटूला मुंबई खिलाडीजने आपल्या गोटात ठेवले असून त्यांनी गजानन शेंगल आणि श्रीजेश एस. यांनाही शुभारंभी आवृत्तीतील त्यांच्या प्रभावी कामगिरीनंतर कायम ठेवले आहे. विजय हजारे, आदित्य गणपुले आणि लक्ष्मण गावस हे अनुक्रमे राजस्थान वॉरियर्स, तेलुगु योद्धा आणि चेन्नई क्विक गन्स यांनी निवडलेले अन्य स्टार खेळाडू आहेत.
गुजरात जायंट्स आणि राजस्थान वॉरियर्स यांनी त्यांचे संघ पूर्ण करताना अनुक्रमे 25 आणि 22 खेळाडू निवडले असून गतविजेत्या ओडिशा जगरनॉट्सनीही तऊण खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांचा चांगला समतोल राखला आहे. ‘अल्टिमेट खो खो सिझन 2’ तऊण भारतीय चाहत्यांना आकर्षित करेल. विशेष म्हणजे या मोसमात 33 खेळाडू हे 16 ते 18 वयोगटातील आहेत. 22.5 वर्षांच्या सरासरी वयासह दुसरा मोसम अधिक वेगवान, अधिक मजबूत आणि धाडसी होण्यासाठी सज्ज झाला आहे, असे ‘यूकेके’चे सीईओ आणि लीग कमिशनर तेनझिंग नियोगी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.









