5537 जणांचा बळी : इवांका ट्रम्प यांचेही विलगीकरण : युरोपीय देशांमधील संकटाची तीव्रता अधिक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जगभरात कोरोना विषाणूचे एकूण 1 लाख 45 हजार 958 रुग्ण सापडले आहेत. शनिवारी दुपारपर्यंत एकूण 5537 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या आणि त्यांच्या वरिष्ठ सल्लागार इवांका ट्रम्प या कोरोनाने ग्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱयाची भेट घेतल्यापासून घरातूनच काम करत आहेत. मागील आठवडय़ात इवांका यांनी ऑस्ट्रेलियाच्या मंत्र्याची भेट घेतली होती. या मंत्र्याला कोरानाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो देखील क्वारेंटाइन झाले आहेत.
पाकिस्तान सरकारने कुठल्याही ठिकाणी गर्दी करण्यास बंदी घातली आहे. परिषद तसेच विवाहसोहळयात सामील लोकांवरही ही बंदी असेल. तर ऍपलने चीन वगळता उर्वरित जगातील सर्व स्टोअर्स 27 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे.
पाकमधील संकट वाढले
पाकिस्तानात शनिवारी सकाळपर्यंत 28 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान सरकारने इराण आणि अफगाणिस्तानला लागून असलेली सीमा 2 आठवडय़ांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंध प्रांतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 15 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. इराणमधून परतलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. कराची, इस्लामाबाद आणि लाहोर व्यतिरिक्त कुठल्याही विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाण होणार नाही.
रशियाने सीमा केली बंद
रशियाच्या सरकारने पोलंड आणि नॉर्वेला लागून असलेली सीमा बंद केली आहे. पोलंड आणि नॉर्वे हे युरोपीय देश असून तेथे कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. रशियात शनिवारपर्यंत रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे.
सौदी जनगणना स्थगित
सौदी अरेबियात कोरोनाने ग्रस्त लोकांची संख्या शनिवारी 86 झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दोन कठोर पावले उचलली आहेत. 2020 मध्ये होणारी जनगणना प्रक्रिया रोखण्यात आली आहे. तसेच सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर रविवारपासून बंदी लागू होणार आहे.
ब्रिटनमध्ये नवजाताला संसर्ग
ब्रिटनमध्ये एका नवजाताला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित बाळाच्या मातेलाही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवरही उपचार केले जात आहेत. गर्भाशयात का जन्मानंतर नवजाताला कोरोनाची लागण झाली याचा शोध डॉक्टर घेत आहेत. ब्रिटनमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत 800 रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
रवांडात भारतीयाला लागण
मध्यपूर्व आफ्रिकेतील रवांडा या देशातही कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला आहे. तेथील एका भारतीयाला कोरोनाची लागण झाली आहे. हा भारतीय 8 मार्च रोजी रवांडा येथे गेला होता. 13 मार्च रोजी त्याची चाचणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रवांडाच्या आरोग्य मंत्रालयाने भारतीयाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
थायलंडमध्येही रुग्ण वाढले
थायलंडमध्ये शनिवारी कोरोनाचे 7 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 82 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व विमानतळांवर अत्याधुनिक थर्मल स्कॅनर आणि मोबाईल टेस्ट लॅब युनिट तैनात करण्यात आले आहे. तसेच संकटग्रस्त देशांमधून येणाऱया पर्यटकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
ट्रुडो यांचे आयसोलेशन
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नी सोफी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या कारणामुळे जस्टिन हे आता घरातूनच कामकाज सांभाळत आहेत. यासंबंधीचे छायाचित्र त्यांनी ट्विटरवर प्रसारित केले आहेत. तर त्यांच्या मुलांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जस्टिन यांच्यात अद्याप कोरोनाची कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाहीत.









