एबीसी कार्यक्रम अपयशी : प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज : प्रभावीपणे नसबंदी करण्याची आवश्यकता
बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे बेळगावमधील नागरिक वैतागले आहेत. आता तर थेट हल्ले करून जखमी करण्याचे प्रकार शहरात वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. एक धक्कादायक माहिती समोर आली असून मागील तीन महिन्यात 14 हजार 324 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बळी जाण्यापूर्वी प्रशासनाने भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. गुरुवारी भटक्या कुत्र्याने एससी मोटर्सनजीकच्या मारुतीनगर येथे 1 वर्षे 10 महिन्याच्या चिमुरडीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव्यामुळे अशाप्रकारच्या हल्ल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. अनेक जखमींवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. मात्र याची नोंद जिल्हा देखरेख कार्यालयामध्ये करण्यात येत नाही. वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे संबंधित खात्याचे अपयश यातून दिसून येते.
ऑगस्टमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्याच्या 1684 घटना घडल्या होत्या. तर गेल्या तीन महिन्यात सुमारे 14 हजार 324 घटना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालू वर्षात राज्यभरात कुत्र्यांच्या हल्ल्याच्या 3.59 लाख घटना घडल्या असून रेबिज संबंधित 30 मृत्यूचीही नोंद झाली आहे. प्रशासनाने याकडे मोठ्या घटना घडण्याअगोदर गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. तसेच संबंधित विभागाने याबाबत उपाययोजना करण्याचीही गरज आहे. बिम्स रुग्णालयात यावर्षी 2471 कुत्रा चावण्याच्या घटनांची नोंद झाली असून रेबिजमुळे 6 मृत्यूही झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात महापालिका, दोन शहर नगरपालिका व अनेक नगरपालिका, नगरपंचायत कार्यरत आहेत. भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी बनविलेला प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) कार्यक्रम अपेक्षित परिणामकारक होत नसल्याचे यातून दिसून येत आहे. यामुळे एबीसीने यावर योग्यरित्या काम करून याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
महापालिका शहर व उपनगरांत भटक्या कुत्र्यांची संख्या 20 हजारपेक्षा कमी असल्याचा दावा करत असले तरी ही संख्या 40 हजारहून अधिक असल्याचे समजते. तसेच केवळ 200 कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. यामुळे एबीसी उपक्रम वाढत्या कुत्र्यांची संख्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने व मांसाहारी कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकण्यात येतो. याकडे भटकी कुत्री प्रकर्षाने आकर्षित होतात. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
नसबंदीच्या प्रयत्नांच्या अभावामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. यामुळे भटकी कुत्री हल्ल्यांमुळे नागरिकांनाही जेरिस आणले आहे. वारंवार आवाहन करूनही कुत्र्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून हीच मोठी शोकांतिका आहे. नागरिक सकाळी विविध कामांसाठी बाहेर पडतात. त्यावेळी भटक्या कुत्र्यांचा जमाव पाठलाग करत असल्याचे अनेकवेळा दिसून येते. यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. एबीसी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाने कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची गरज असून सर्वसामान्यांनी आपला कचरा रस्त्याकडेला न फेकता कचऱ्याच्या गाडीत टाकण्याचीही आवश्यकता आहे. यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. योग्यरित्या उपाययोजना न केल्यास कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढच होत राहणार असून परिणामी रेबिजचा धोका आ वासून समोर येणार आहे. यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागणार असून प्रशानसनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.









