गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा फटका
मुंबई ः
अमेरिकेत चार दशकानंतर महागाई उच्चांकी स्तरावर पोहोचल्याचा नकारात्मक परिणाम सोमवारी भारतीय शेअरबाजारावर दिसून आला. मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक सोमवारी तब्बल 1,457 अंकांनी कोसळला होता. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण त्याचप्रमाणे डॉलर्सच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण बाजारासाठी मारक ठरली. दरम्यान, सोमवारी एकाच दिवशी 6.64 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे बुडाले असल्याची बाब समोर आली आहे.
30 समभागांचा बीएसई निर्देशांक 1,456 अंकांनी घसरत 52,846.70 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 427 अंकांनी घसरत 15,774.40 अंकांवर बंद झाला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रक्कम काढून घेण्याचा सिलसिला सोमवारीही चालूच ठेवला होता. अमेरिकेन डॉलर्सच्या तुलनेत रुपया घसरुन 78.29 पर्यंत खाली आला होता.









