कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर विधानसभा मतदारसंघातील (Karveer Constituency) विविध विकास कामासाठी गेल्या तीन वर्षात 140 कोटी रुपये निधी आणला आहे. गत वर्षात नऊ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यापैकी काही कामे पुर्ण झाली आहेत तर अनेक कामे सुरू आहेत, अशी माहिती आमदार पी.एन.पाटील- सडोलीकर ( MLA PN Patil) यांनी दिली.
गेल्या तीन वर्षात करवीर मतदारसंघात गाव व वाडीवस्ती तेथे विकास या सूत्रानुसार विकास कामांचे नियोजन केलेले आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले आहे. मतदारसंघातील एकही गाव निधी व विकासापासून वंचित राहिलेले नाही. सन २०२२-२३ सालाकरीता करवीर मतदार संघातील विविध विकास कामासाठी नऊ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून 5 कोटी रुपयांचा निधी तर डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत 3 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
या निधीतून शिरोली दुमाला, चिखली पैकी सोनतळी, रजपूतवाडी, हसुर दुमाला, पाडळी खुर्द, सडोली खालसा, बाचणी, पाटेकरवाडी, शिंगणापूर, शिये, असळज, मुटकेश्वर, किरवे, वेतवडे, कोदे बु., साखरी म्हाळुंगे, वाळोली, यवलुज, कळे, मरळी, माजगाव, बाजारभोगाव, सावर्डे तर्फ असंडोली, गोठमवाडी, गोठे यासह अन्य गावांत कामे होणार आहेत. या अंतर्गत विविध गावातील रस्ते, सांस्कृतिक सभागृह, गटर्स व अन्य विकास कामांना वेग दिलेला आहे. त्यापैकी काही ठिकाणची कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत मतदार संघातील सर्व 236 गावांमध्ये निधी दिलेला असून संबंधित गावातीलच ठेकेदारांकडे काम देऊन बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे त्यांनी सांगितले. धामणी मध्यम प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करून जुन्या ठेकेदाराचे देणे भागवून नवीन कामासाठी 325 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.