भारत बायोटेक या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा निर्णय
हैदराबाद / वृत्तसंस्था
कोरोनाविरोधातील ‘कोव्हॅक्सिन’ या लसीचे 14 राज्यांना थेट वितरण करण्याचा निर्णय या लसीची निर्मिती करणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत बायोटेकने घेतला आहे. या वितरणाला 1 मे पासून प्रारंभ करण्यात आला असून लवकरच वितरणाचा वेग आणि प्रमाण वाढविण्यात येणार आहे.
या 14 राज्यांमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राचाही समावेश आहे. कंपनीने राज्यांसाठी या लसीची किंमतही 600 रूपये प्रतिडोस वरून 400 रूपये प्रतिडोस अशी कमी केली आहे. कोणत्या राज्याला किती लस द्यावयाची, हे प्रमाण केंद्र सरकारने ठरवून दिले असून त्यानुसार हे वितरण करण्यात येत आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राशिवाय आंध्रप्रदेश, आसाम, छत्तिसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना लस पुरवठा केला जात आहे.
प्रभावी आणि सुरक्षित
कोव्हॅक्सिन ही भारतनिर्मित लस 80 टक्क्यांहून अधिक प्रमाणात प्रभावी असून पूर्णतः सुरक्षित आहे. या लसीच्या तिसऱया टप्प्यातील परीक्षणांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यातून ही लस कोरोनाच्या विविध रुपांवरही प्रभावी ठरते असे प्रमाणपत्र आयसीएमआर सरकारी संस्थेने दिले आहे. ही लस पूर्णतः सुरक्षित असून तिचे दुष्परिणाम अत्यल्प लोकांवर दिसून येतात. आगामी काळात या लसीचे उत्पादन वाढविण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.









