► वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूमच्या विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू येथे विषारी दारुच्या सेवनामुळे 14 जणांचा बळी गेला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या दोन स्थानी अशा दोन घटना घडल्या आहेत. यांपैकी 9 बळी विल्लुपुरममध्ये तर 5 बळी चेंगलपट्टू येथे गेले आहेत. याशिवाय विषारी दारुच्या प्राशनामुळे आजारी पडल्याने 51 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी विल्लुपुरमच्या एसपींना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. ही दोन्ही स्थाने मासेमारी करणाऱ्यांची असून तेथे काही लोकांनी विषारी दारुचे प्राशन केल्याची घटना घडली होती. चेंगलपट्टू जिल्ह्याच्या मदुरंगस्थानम येथे शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. गावठी दारुत मिथेनॉलचे मिश्रण झाल्याने या दुर्घटना घडल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.









