अहिल्या परकाळे, कोल्हापूर
विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर व्हावे, यासाठी त्यांच्या संकल्पनांना व नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्टार्टअप सुरू केले आहे. शिवाजी विद्यापीठात सेक्शन -8 कंपनी सुरू केली असून यातून अनेक संशोधकांना पेटंटसह कंपनीची स्थापना करून दिली जाईल. सध्या विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व समाजातील अनेक घटकांनी 14 संशोधनाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या प्रस्तावांना तज्ञांची मान्यता मिळाली असून, त्यांची स्वतःची कंपनी किंवा पेटंट नोंदणीसाठी हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले आहेत. विद्यापीठातील स्टार्टअपमधून अनेकजण आत्मनिर्भर बनतीलच पण इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देतील, ही गोष्ट विद्यापीठाच्या दृष्टीने गौरवास्पद आहे.
शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालय आणि समाजातील अनेकांकडे भरपूर संकल्पना असतात. परंतु, या संकल्पना प्रत्यक्षात उरवण्यासाठी त्यांना व्यासपीठ व आर्थिक मदत मिळत नाही. या संकल्पनांना व्यासपीठ व निधी उपलब्ध करून देण्याचे काम विद्यापीठ स्टार्टअपच्या माध्यमातून करताना दिसत आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून मुग्धा सावंत यांनी कॅपेन फ्री कॉफीः डिकॅप बनवले आहे. शरीराला घातक असणारे कॉफीतील कॅफेन बाजूला काढले आहे. त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम होणार नाहीत. तसेच विश्वजीत खाडे यांनी ऑर्डिनो स्टेल हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण तयार केले आहे. यातून हार्डवेअर कनेक्टीविटी, मॉनिटरिग प्रयोग, हार्डवेअर स्टॅटस मॉनिटरिंग कंट्रोल करता येते. डॉ. चिराग नारायण यांनी ‘शिवतेज ऑईल’ सांधेदुखीवरील हर्बल तेल तयार केले आहे. हे तेल हाडे व सांधे विकारावर आयुर्वेदिक दिर्घकालीन उपाय आहे. डॉ. सुप्रिया कुसाळे यांनी बॉयोफर्टीलायझर उत्पादन केले आहे.
सेंद्रीय शेतीला पूरक ‘सूर्या ऍग्रो बायोटिक’ कंपनी स्थापन करून सूक्ष्मजीवांपासून जैविक खत तयार केले आहे. संग्राम पाटील यांनी ऊस लावणी यंत्र तयार केले असून, या यंत्राच्या सहाय्याने सरीतील व रोपातील अंतर योग्य ठेवून ऊसलावणी करता येते. डॉ. सागर डेळेकर यांनी ऍन्टीबॅक्टेरीयल पेंट तयार केला आहे. याचा उपयोग हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये करता येतो. त्यांनी पेटंटसाठी प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धनंजय वडेर यांनी आरोग्यदायी ‘बदाम थंडाई’ तयार केली आहे. बध्दकोष्ठता नियंत्रण, पचनक्रिया वाढतेच पण रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. श्रीनिवास कुंभार यांनी ‘शनी ऑपरेटिंग सिस्टम’ तयार केली आहे.
भविष्यात अनेक संस्था या सिस्टमचा वापर करण्याची शक्यता आहे. दिग्विजय आजरेकर यांनी ‘अल्ट्रा’ नेब्युलायझर तयार केले आहे. दम्यासह फुफुसाचा आजार असणाऱयांना वाफ घेण्यासाठी ही मशिन उपयोगी पडणार आहे. याला लाईटची गरज भासणार नसून मोबाईलवर ऑपरेट करता येईल. राजवर्धन शिंदे यांनी शरीराच्या स्कॅनिंगसाठी थ्रीडी ऍप तयार केले आहे. यासह अन्य संशोधकांनी आपले प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले आहेत. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यास या संशोधकांच्या नवसंकल्पना प्रत्यक्षात पेटंट किंवा कंपनीच्या स्वरूपात नावारूपाला येतील. यातून हे संशोधक स्वतः आत्मनिर्भर बनतीलच परंतू अन्य दहाजणांना रोजगार उपलब्ध करून देतील.
अनेकांना रोजगार मिळणार
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप यात्रा राज्यभर फिरली. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कोणाचीही नवसंकल्पना नोंदवता येते. ती समाजोपयोगी असल्यास व्यवसायासाठी मान्यता व आवश्यक साधने उपलब्ध करून दिली जातील. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नवसंकल्पनांची निर्मिती होते. यालाच व्यवसायाचे स्वरूप मिळेल.
स्टार्टअप हब करण्याचा मानस
शिवाजी विद्यापीठातील इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात स्टार्टअप हब निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. ज्यांच्या नवसंकल्पना आहेत त्यांना विद्यापीठ मदत करून उद्योजक तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी समाजातील सर्वांनी आपल्या नवसंकल्पनेची विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंद करावी.
डॉ. एम. एस. देशमुख (संचालक, इनोव्हेशन इन्क्युबेशन ऍण्ड लिंकेजस)
Previous Articleउदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी, नाना पटोलेंच्या राजापूर दौऱ्यावेळी घडला प्रकार
Next Article सायबर कॅफेला लागली आग…!









