विजयनगर परिसरातील घटना : एका गायीवरही हल्ला : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव : विजयनगर, रक्षक कॉलनी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. कुत्र्याने 14 जणांचा चावा घेतला असून एका गायीवरही हल्ला केला आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून त्या कुत्र्याला पकडण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुत्रा हाती लागला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. रक्षक कॉलनी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक काही जणांवर हल्ला केला. नेमके काय घडले, हेच समजले नाही. त्या कुत्र्याला हुसकावण्यासाठी आलेल्या अनेकांचा त्याने चावा घेतला आहे. कुत्रा इकडे तिकडे धाव घेत होता. ये-जा करणाऱ्या वाहनचालकांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न कुत्र्याने केला आहे. यामुळे वाहनचालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. यावेळी काही वाहनचालक घसरून पडले. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. रात्री उशिरापर्यंत कुत्र्याला पकडण्यासाठी काही तरुण कुत्र्याच्या पाठीमागून धाव घेत होते. मात्र, तो हाती लागला नाही. या घटनेमुळे विजयनगर, हिंडलगासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घराबाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. कुत्रा घरामध्ये शिरेल या भीतीने अनेकांनी घराचे दरवाजेच बंद केले. या कुत्र्याने एका गायीचाही चावा घेतला आहे. कुत्र्याच्या गोंधळामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. चावा घेतलेल्या सर्वांनाच उपचार घेण्याची वेळ आली आहे. महानगरपालिका तसेच हिंडलगा ग्राम पंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.









