14 people saved the youth’s life by donating blood at the same time in Goa
ओटवणे / प्रतिनिधी
अपघातात गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव झालेल्या सावंतवाडीतील विधान परमार या युवकाला गोवा बांबोळी रुग्णालयात रक्ताची गरज असल्याचे समजताच जिल्ह्यातील १४ जणांनी तात्काळ गोवा गाठून रक्तदान करीत या युवकाचे प्राण वाचविले. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, (सिंधुदुर्ग) आणि शिवप्रेमी ग्रुप (कुडाळ) यांच्या माध्यमातून या चौदा जणांनी हे रक्तदान केले.
सावंतवाडी येथील विधान परमार हा युवक रविवारी रात्री झाराप झिरो पॉइंट येथे झालेल्या अपघात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमेतून अति रक्तस्त्राव झाल्याने त्याला १४ रक्तदात्यांची गरज होती. याबाबत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे लक्ष वेधताच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ तसेच शिवप्रेमी ग्रुपचे रमाकांत नाईक, प्रसाद चोरगे यांनी रक्तदाते उपलब्ध होण्यासाठी त्वरीत नियोजन केले.









