राष्ट्रगीतावेळी उभे न राहिल्याने कारवाई : काश्मीरमधील प्रकार
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रशासनाने काही पोलिसांना निलंबितही केले आहे. राष्ट्रगीत सुरू असताना प्रत्येक व्यक्तीने त्याचा आदर राखून उभे राहणे ही या पोलिसांची जबाबदारी होती. हे प्रकरण 25 जून रोजी आयोजित ‘पॅडल फॉर पीस’ सायकलिंग शर्यतीच्या समारोप समारंभादरम्यान घडली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि डीजीपी दिलबाग सिंह उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर अनेकजण जाणीवपूर्वक त्याला आदर देण्यासाठी उभे राहिले नाहीत. राष्ट्रगीताच्या अनादराची गंभीर दखल घेत जम्मू-काश्मीर प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 107 आणि 151 अंतर्गत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कलमांमुळे गुन्हा केल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना दिला जातो. अटक केलेल्या सर्वांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.









