अबकारी-आरपीएफच्या अधिकाऱ्यांची कारवाई दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
बेळगाव : अबकारी व आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेत 14 किलो गांजा जप्त केला आहे. बुधवारी लोंढा रेल्वेस्थानकावर ही कारवाई करण्यात आली असून सूटकेसमधून गांजाची वाहतूक करण्यात येत होती. यासंबंधी दोघा अज्ञातांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अबकारी विभागाचे उपअधीक्षक रवी मुरगोड, मल्लेश उप्पार, दुंडाप्पा हक्की, विनोद व लोंढा येथील आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. शालीमारहून गोव्याला जाणाऱ्या रेल्वेत गांजासाठा आढळून आला आहे. 21674/सीएससी क्रमांकाच्या बोगीत एका सूटकेसमध्ये 10 किलो 281 ग्रॅम गांजा आढळून आला आहे.
याच बोगीत आढळलेल्या एका बॅगमध्ये 4 किलो 211 ग्रॅम गांजा अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. बॅग व सूटकेस कोणी व कोठून आणली, याचा उलगडा झाला नाही. अबकारी व आरपीएफच्या कारवाईनंतर गांजाची वाहतूक करणाऱ्यांनी तेथून पलायन केले आहे. यासंबंधी दोघा अज्ञातांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग, अथणी, रामदुर्गसह विविध तालुक्यांतून बेळगावला गांजा पुरवठा केला जातो. शालीमारहून गोव्याला जाणाऱ्या रेल्वेत गांजाची वाहतूक करण्यात येत होती. हा साठा गोव्याला नेण्यात येत होता की आणखी कोठे? याचा उलगडा झाला नाही. अधिकाऱ्यांनी एकूण 14 किलो 492 ग्रॅम गांजासाठा जप्त केला आहे.









